मुंबई येथील अॅक्सिस बँकेच्या नियंत्रण कक्षात पुण्यातील रहाटणी येथील बँकेचे एटीएम फोडत असल्याचे कर्मचाऱ्यांना सीसीटीव्हीमुळे आढळून आले. त्यांनी तत्काळ संकेतस्थळावरून क्रमांक मिळवून पोलीस ठाणे आणि रात्री गस्तीवर असणाऱ्या अधिकाऱ्याला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचून दोघांना पकडले. मात्र, एक आरोपी पळून गेला.
सहिदुल रफिक मंडल (वय २२, रा. कोलकाता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्रे शिंदे यांनी सांगितले की, रात्री अडीचच्या सुमारास अॅक्सिस बँकेच्या मुंबई येथील नियंत्रण कक्षातून रहाटणीच्या आनंदपार्क येथील अॅक्सिस बँकेचे एटीएम दोन व्यक्ती फोडत असल्याचा फोन आला. त्यानुसार पाच मिनिटात घटनास्थळी एक पथक घेऊन पोचलो. मोटारी दूर अंतरावर लावून एटीएमला चारीही बाजूनी घेरले. आरोपींना जाऊन पकडले. मात्र, एक आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला हिसका मारून पळून गेला. अटक केलेल्या आरोपीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.
पुण्यातील अॅक्सीस बँकेच्या एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. या एटीएमच्या सुरक्षिततेचे काम सिक्योरॉन ही कंपनी करीत आहे. या कॅमेऱ्याच्या चित्रीकरण मुंबई येथील नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाते. शनिवारी पाहटे सव्वा दोनच्या सुमारास दोन व्यक्ती एटीएम फोडत असल्याचे आढळून आले. त्यांनी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर जाऊन पोलीस ठाण्याचा क्रमांक मिळवला. त्या बरोबरच रात्रीच्या गस्तीवर असणारे सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्रे शिंदे यांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना कळविले. शिंदे यांनी एक पथक घेऊन घटनास्थळी तत्काळ पोहचले. त्यांनी आरोपींना सापळा रचून अटक केली.