डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे हल्लेखोर विविध ठिकाणच्या सात सीसीटीव्ही चित्रीकरणात पोलिसांना दिसून आले आहेत. हल्ला करण्याच्या अगोदर हल्लेखोर काही मिनिटे घटनास्थळाच्या परिसरात फिरताना सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत आहेत. मात्र, सीसीटीव्ही चित्रीकरण अस्पष्ट आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.
ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा सात वाजता मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी डॉ. दाभोलकर यांची गोळय़ा झाडून हत्या केली होती. या घटनेला तेरा दिवस उलटून गेले तरी पोलिसांना ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत. अजूनही विविध शक्यतांवर तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळ आणि शहरातील विविध ठिकाणचे ११० सीसीटीव्ही चित्रीकरण गोळा केले आहे. त्यातील बहुतांश चित्रीकरण पोलिसांनी पाहिले आहे. ओंकारेश्वर मंदिराच्या जवळील शनिवार पेठ पोलीस चौकीपासून दुचाकीवर येताना आणि जाताना आरोपी दिसत आहेत. याचे सीसीटीव्ही चित्रीकरण अस्पष्ट असल्यामुळे पोलिसांनी ते अधिक स्पष्ट करण्यासाठी लंडनला पाठविले आहे.
पोलिसांनी या परिसरातील आणखी सीसीटीव्ही चित्रीकरण पाहिले असता शनिवार पेठ, जंगली महाराज रस्ता या परिसरातील सात सीसीटीव्ही चित्रीकरणात हल्लेखोर येताना दिसत आहेत. मात्र या चित्रीकरणात हल्लेखोर पुढे कुठे जात आहेत याचे चित्रीकरण मिळालेले नाही. दिसत असलेले चित्रीकरण अस्पष्ट दिसते आहे, असे भामरे यांनी सांगितले.
सीसीटीव्ही: एक वर्षांनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’!
एक वर्षांपूर्वी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी शोधण्यासाठी या परिसरातील सीसीटीव्ही पाहण्यात आले. पण, अनेक दुकानात सीसीटीव्ही नसल्याचे, तर काही ठिकाणी ते बंद असल्याचे आढळून आले. ज्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळाले होते ते अस्पष्ट असल्यामुळे तपासात अडचणी आल्या होत्या. त्यानंतर शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सीसीटीव्ही बसविण्याची घोषणा केली. पण, एक वर्षांनंतरही परिस्थिती सुधारली नाही. डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळाले असले तरी ते अस्पष्ट स्वरूपाचे आहे. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत.