पतीविरुद्ध गुन्हा; भोसरीतील घटना
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना भोसरी परिसरात शुक्रवारी (२२ जुलै) मध्यरात्री घडली. पत्नीला गळफास देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुर बाळासाहेब दौंडकर (वय २६, रा. सँडविक कॉलनी, दिघी रस्ता, भोसरी) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे. श्रद्धा मयुर दौंडकर (वय २०) यांनी यांसदर्भात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयुर आणि श्रद्धा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्याने श्रद्धाकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली होती. शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास त्याने नायलॉनची दोरी पंख्याला बांधली आणि श्रद्धाला लाकडी स्टुलावर उभे केले. त्याने तिच्या गळ्यात दोरीचा फास टाकला आणि लाकडी स्टुल ढकलून देण्याचा प्रयत्न केला.
पतीच्या धमक्यांना घाबरलेल्या श्रद्धाने शनिवारी पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.जे.जगदाळे तपास करत आहेत.

पतसंस्थेतील कर्मचाऱ्यावर वार करून रोकड लुटली
पुणे : पतसंस्थेतील कर्मचाऱ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून चोरटय़ांनी ३० हजारांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी (२२ जुलै) बालेवाडी येथे घडली.बाळासाहेब ओझाळे (वय ३२, रा. हिंजवडी) असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ओझाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा चोरटय़ांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओझाळे बाणेर पतपेढी संस्थेत कामाला आहेत. पतसंस्थेसाठी दैनंदिन ठेवी गोळा करण्याचे काम ते करतात. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओझाळे दुचाकीवरून निघाले होते. बालेवाडी जकात नाका परिसरात ते कामानिमित्त थांबले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरटय़ांनी त्यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवला. पाकीट व मोबाईल देण्याची मागणी चोरटय़ांनी केली. ओझाळे यांनी नकार दिला. चोरटय़ांनी ओझाळे यांच्या पोटावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यांच्याकडील ३० हजारांची रोकड ठेवलेली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.एस. भोगम तपास करत आहेत.

गज कापून पावणेतीन लाखांचा ऐवज लांबविला
पुणे : एरंडवणे भागात खिडकीचे गज कापून सदानिकेत शिरलेल्या चोरटय़ांनी २ लाख ७६ हजारांचे दागिने लांबविले. एरंडवणे भागात शुक्रवारी (२२ जुलै) दुपारी ही घटना घडली.
वीरेंद्र गोडबोले (वय ५४, रा. एरंडवणे) यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडबोले शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सदनिकेला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर पडले. चोरटय़ांनी गोडबोले यांच्या सदनिकेचे खिडकीचे गज कापून प्रवेश केला. कपाटातील पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. पोलीस उपनिरीक्षक ए.एम. खरात तपास करत आहेत.