‘महिलांची भगिनी निवेदिता बँक’ आज स्ववास्तूमध्ये..

‘महिलांनी सर्वासाठी सुरू केलेली पहिली बँक’ म्हणून लौकिक असलेल्या भगिनी निवेदिता सहकारी बँकेचे स्ववास्तूत मुख्य कार्यालय सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. बँकचे मुख्य कार्यालय रविवारी (२९ जानेवारी) प्रभात रस्त्यावरील स्ववास्तूत सुरू होत असून महिलांनी महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने चव्वेचाळीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या बँकेने बँकिंग क्षेत्रात आजवर लक्षणीय कामगिरी केली आहे. बँकिंग क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठेचे […]

‘महिलांनी सर्वासाठी सुरू केलेली पहिली बँक’ म्हणून लौकिक असलेल्या भगिनी निवेदिता सहकारी बँकेचे स्ववास्तूत मुख्य कार्यालय सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. बँकचे मुख्य कार्यालय रविवारी (२९ जानेवारी) प्रभात रस्त्यावरील स्ववास्तूत सुरू होत असून महिलांनी महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने चव्वेचाळीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या बँकेने बँकिंग क्षेत्रात आजवर लक्षणीय कामगिरी केली आहे. बँकिंग क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कारही बँकेला मिळाले आहेत.

पुणे शहर व परिसरात १८ शाखा, तेराशे कोटींच्यावर ठेवी, पन्नास हजार सभासद, दीडशे कोटींच्यावर स्वनिधी, पंधरा टक्के लाभांश, सातत्याने लेखापरीक्षणाचा अ वर्ग अशी बँकेची सद्यस्थिती असून बँकेत सुरक्षारक्षक वगळता उर्वरित सर्व कामे महिला करतात. बँकेत दोनशे ऐंशी महिला कर्मचारी आहेत. बँकेच्या नऊ शाखा स्ववास्तूत असून आता मुख्य कार्यालय प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक आठ येथे निवेदिता भवन येथे सुरू होत आहे. स्थापनेपासून बँकेच्या संचालक मंडळावर महिला काम करत आहेत.

‘‘महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील नागरिकांनाही बँकिंग सेवेचा लाभ मिळावा या हेतूने सनदी लेखापाल विवेक दाढे आणि मीनाक्षी दाढे यांनी सन १९७४ मध्ये भगिनी निवेदिता सहकारी बँक सुरू  केली. त्या काळात सावकार भरमसाठ व्याज आकारत, कितीही परतफेड केली तरी मुद्दल कायम रहात असे. अशा काळात मीनाक्षीताई दाढे पदरमोड करून जमेल तेवढे साहाय्य महिलांना करत असत. ती परिस्थिती पाहून वाजवी दरात गरजूंना कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच लोकांना बचतीचीही सवय लावावी, असा विचार पुढे आला आणि त्यातून ही बँक सुरू झाली. महिलांमध्ये उपजतच जे गुण असतात ते लक्षात घेऊन महिलांनी सर्वासाठी चालवलेली बँक असे बँकेचे स्वरूप प्रारंभापासूनच निश्चित करण्यात आले आणि आजतागायत ते कायम आहे,’’ अशा शब्दांत बँकेच्या अध्यक्ष जयश्री कुरुंदवाडकर आणि रेवती पैठणकर यांनी बँकेचा इतिहास सांगितला. पैठणकर बँकेच्या उपाध्यक्ष आणि सनदी लेखापाल आहेत. सुरुवातीला बायका बँक चालवू शकतात, यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. लोक बँकेत पैसे गुंतवायलाही तयार नसत. अशा वातावरणात महिलांनी या बँकेची पायाभरणी केली असेही त्यांनी सांगितले.

‘‘बँक महिलांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देते. बँकेचे सर्व कामकाज महिला चालवतात आणि या कामगिरीत त्या कुठेही कमी पडत नाहीत,’’ असे बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे यांनी सांगितले. बँक महिला चालवत असल्या तरी बँकिंग सेवा सर्वाना दिली जाते आणि आमच्या उत्कृष्ट ग्राहक सेवेचा अनुभव आमच्या ग्राहकांना मिळतो. महिलांमध्ये चिकाटी, सातत्य, एखाद्या विषयाचा पाठपुरावा करणे, कष्ट करणे हे गुण उपजत असतात. त्याचा बँकेला सर्व प्रकारच्या कामकाजात नेहमीच फायदा होतो. कर्जवसुली देखील याच चिकाटीने आम्ही करतो, असेही त्या म्हणाल्या.

बँकेचे मुख्य कार्यालय स्वत:च्या भव्य वास्तूत सुरू होत आहे याचा आम्हा सगळ्यांना खूप आनंद होत आहे आणि आता व्यवसायाचा विस्तार करण्याची जबाबदारीही आमच्यावर आली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यात आम्ही सर्वजणी मिळून यशस्वी होऊ, असेही मनोगत त्यांनी व्यक्त केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhagini nivedita sahakari bank ltd branc h open at prabhat road