|| प्राची आमले

पुस्तकांची अजब दुनिया वाचनप्रेमी माणसाला आकर्षित करते. खुदकन गाली हसू आणण्याबरोबरच आठवणीत रमण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याचा मार्ग दाखविणारी पुस्तके माणसाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. पुस्तकांचे हे महत्त्व ओळखून ज्यांना पुस्तके विकत घेणे शक्य नाही अशा अनाथाश्रमातील मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासत परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करण्याचे अनोखे काम ‘बुकवाला’ ही संस्था करत आहे.

‘देणाऱ्याने देत जावे’ या विंदा करंदीकर यांच्या काव्यपंक्ती प्रत्यक्षात उतरवून समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून ‘बुकवाला’ ही संस्था गेल्या आठ वर्षांपासून अनाथ मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. बालवयातच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली गेली तर भविष्यातील त्यांच्या जीवनाची वाट अधिक संस्कारक्षम आणि सुकर होईल या हेतूने ‘बुकवाला’ संस्था काम करत आहे. अनाथाश्रमांमध्ये जाऊन पुस्तकांचे वाचन करणे, नव्या पुस्तकांची ओळख करून देणे असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष नितीन दुबल यांनी दिली.

अनाथ मुलांनी आपली सगळी दु:खे विसरून पुस्तकांच्या विश्वात रमावे हाच संस्थेच्या कामाचा मूळ हेतू आहे. पुस्तकांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये संस्कार मूल्ये रूजावीत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा आणि आपला भूतकाळ विसरून त्यांनी सर्वसाधारण मुलांप्रमाणे आयुष्य जगावे यासाठी प्रयत्न केले जातात. ‘बुकवाला’मध्ये मराठी, इंग्रजी भाषेतील गोष्टींची पुस्तके, कथा, कादंबऱ्या, सुपरहिरो अशी वेगवेगळी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. संस्थेच्या स्वयंसेवकांनी ‘एस ओ एस चिल्ड्रन व्हिलेज’ आणि ‘मानव्य’ या संस्थेतील मुलांसाठी ग्रंथालय तयार केली आहेत. मुलांच्या वयोगटानुसार  हिरवा, लाल, पिवळा, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगाच्या पट्टय़ा लावल्या जातात. मुलांची वाचनाची रूची वाढत असताना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार पुस्तके वाचावयास दिली जातात. संस्थांमधील मुले ही या ग्रंथालयातील पुस्तके आठवडाभर वाचू शकतात. बुकवाला संस्थेचे स्वयंसेवक आठवडय़ातून एकदा संबंधित संस्थेला भेट देतात आणि तेथील मुलांसमोर एका पुस्तकाचे अभिवाचन करतात. वाचलेल्या पुस्तकांबद्दल मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतात.

बुकवाला संस्थेत काम करणारे सर्व स्वयंसेवक हे विद्यार्थी आहेत. संस्थेचे कामकाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठा वाटा आहे. संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या ‘पुस्तकांचे दान’ या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ज्यांचे वाचन झाले आहे अशी पुस्तके बुकवाला संस्थेच्या ग्रंथालयाला भेट दिली जातात. हडपसर येथील अनाथाश्रमामध्ये नव्याने ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात अनेक संस्थांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याचा मानस आहे. ‘बुकवाला ऑर्गनायझेशन’ या नावाने फेसबुक पेज आणि संकेतस्थळ आहे. संस्थेच्या संकेतस्थळावरून संस्थेला मदत करण्याबरोबरच इच्छुक व्यक्ती स्वयंसेवक म्हणूनही सहभागी होऊ शकतात, असे आवाहन दुबल यांनी केले.