लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने स्थायी समितीच्या अध्यक्षाला पिंपरी पालिका भवनातच सापळा रचून रंगेहाथ पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच, बुधवारी (३ ऑगस्ट) या विभागाने लाचखोरी प्रकरणी पालिका मुख्यालयात आणखी एक कारवाई केली. तीन लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगररचना विभागातील सर्व्हेअरला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली.

संदीप फकीरा लबडे (वय-४८) असे या सर्व्हेअरचे नाव आहे. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई झाली. याप्रकरणी ३८ वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या कंपनीचे काम या अधिकाऱ्याने अडवून धरले होते. ते करून देण्यासाठी तीन लाख रूपये देण्याची मागणी आरोपीने केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या विभागाने बुधवारी मुख्यालयात सापळा रचला. त्यानुसार, तक्रारदाराकडून पैसे घेताना आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार करत आहेत.