पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातील एका माजी प्राध्यापकांच्या पंचाहत्तरीसाठी गौरव समिती स्थापण्यात आली असून त्या समितीसाठी सक्तीने निधी वसूल केला जात असल्याची तक्रार विभागातील काही शिक्षकांनी केली आहे.
पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातील माजी प्राध्यापकांच्या पंचाहत्तरीनिमित्त गौरव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने २५ लाख रुपयांचा निधी जमा करण्याचे लक्ष ठेवले असून त्यामधून दरवर्षी एका गणितज्ज्ञाला ‘गणितरत्न’ पुरस्कार देण्यात येणार आहे. या गौरव समितीला निधी देण्यासाठी विभागातील शिक्षक आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सक्ती केली जात असल्याची तक्रार एका शिक्षकानी केली आहे. या समितीची नोंदणी झालेली नाही, त्याचप्रमाणे या निधी संकलनासाठी विभागाने विद्यापीठाची रितसर परवानगी घेतलेली नाही, असेही या शिक्षकांनी सांगितले. एमएससी आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे, कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांकडे अशा प्रकारे खासगी समितीसाठी विभागातील शिक्षकांनी निधी मागणे योग्य आहे का, विद्यापीठाची कोणतीही लेखी पूर्वपरवानगी न घेता अशी समिती स्थापन करून विभागातील शिक्षकांकडे निधीची मागणी करता येऊ शकते का, असे प्रश्न या शिक्षकांनी उपस्थित केले आहेत. या समितीचा उद्देश कितीही चांगला असला, तरी निधी जमा करण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे त्याचा विभागातील शिक्षकांना त्रास होत असल्याची तक्रार या शिक्षकांनी केली आहे.
गणित विभागातील माजी प्राध्यापकांच्या अमृत महोत्सवानिमित्त विभागातर्फे २१ ते २४ एप्रिल या कालावधीमध्ये ‘डीस्कीट मॅथेमॅटिक्स, अलजिब्रा अँड अॅनॅलिसिस’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.