भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा घोळ पक्षाचे नेतृत्व अद्यापही सोडवू शकले नसले, तरी इच्छुक उमेदवारांचे समर्थक सध्या दिल्ली आणि मुंबईत नेत्यांना भेटून त्यांच्याच नेत्याला उमदेवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
भाजमधून इच्छुक असलेले पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट आणि प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांच्यातच आता चुरस असून शिरोळे यांच्या समर्थकांनी शुक्रवारी मुंबईत जाऊन पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शिरोळे यांचे नाव लवकरात लवकर जाहीर करा, अशी विनंती त्यांना केली. भाजपचे पुण्यातील काही नगरसेवक पक्षाचे नेते नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी नागपूरला गेल्याचीही चर्चा आहे. मात्र हा गट कोणाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे ते मात्र अद्याप समजलेले नाही. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवड समितीची बैठक शनिवारी  पुन्हा होत असून या समितीत पुण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनीच पुण्याबाबत निर्णय करावा असे ठरल्यानंतर आता ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष असले, तरी शनिवारी होत असलेल्या बैठकीत पुन्हा एकदा पुण्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसने खासदार सुरेश कलमाडी यांना नकार दिल्यानंतर आता आमदार विनायक निम्हण, युवक काँग्रेसचे विश्वजित कदम यांची नावे चर्चेत असली, तरी आमदार मोहन जोशी यांचेही दिल्लीत प्रयत्न सुरू आहेत. निम्हण यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न करतानाच पुण्यात संपर्क दौरेही सुरू केले असून विविध भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि मेळावे असा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. विश्वजित कदम यांच्या नावासाठी राहुल गांधी आग्रही असल्याचे सांगितले जात असून महाराष्ट्रातील अन्य नेते निम्हण यांच्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे सर्वाचेच समर्थक सध्या दिल्लीत असून नेत्यांच्या भेटीगाठी आणि उमेदवारीसाठी प्रयत्न असा कार्यक्रम सुरू आहे.
दरम्यान, उमेदवार निश्चित होत नसल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संयुक्त मेळाव्याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर हा मेळावा आयोजित केला जाणार आहे. त्याला दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मूळ नियोजनाप्रमाणे तो येत्या एक-दोन दिवसातच होणार होता. मात्र, पुण्यातील उमेदवारीबाबत निर्णय होत नसल्यामुळे मेळावा कसा घेणार असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे तूर्त तरी हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. पुण्याचा उमेदवार जाहीर होताच हा मेळावा जाहीर केला जाईल.