सततच्या वेळ बदलामुळे व्यापारी हैराण

पुणे : शहरात करोनाच्या संसर्गामुळे पुन्हा नव्याने निर्बंध घालण्यात आले आहेत. व्यापारी पेठांमधील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सततच्या वेळ बदलामुळे व्यापारावर परिणाम होत असून रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याची टीका व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे.

शहरातील करोनाचा  संसर्ग कमी होत असताना दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. त्यानंतर सोमवारपासून (२८ जून) आठवडय़ातून पाच दिवस व्यापारी पेठेतील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा प्रशासनाने आदेशाद्वारे दिली. व्यापारी दुकानांच्या वेळेत सतत बदल होत असल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला आहे.

पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया म्हणाले, ‘दुकाने बंद ठेवल्याने किंवा वेळ कमी केल्याने करोना संसर्ग कमी होतो, असा प्रशासनाचा समज आहे. सकाळी सात वाजता दुकाने उघडल्यानंतर व्यापारी पेठेतील सोने-चांदीच्या पेढय़ा, वस्त्रदालने तसेच अन्य दुकानात खरेदीसाठी कोण येणार, याचाही विचार करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करून व्यवसाय करण्यात येत आहे. नोकरदार माणूस खरेदी कधी करणार, याचाही विचार होणे गरजेचे आहे. सततच्या वेळ बदलामुळे व्यापारावर परिणाम झाला आहे. व्यापारी पेठेतील दुकाने दुपारी बारा ते सायंकाळी सात यावेळेत खुली ठेवण्याची मुभा द्यावी. प्रशासनाच्या निर्णयामुळे व्यापारी वर्ग हैराण झाला आहे. गेले दीड वर्ष व्यापारी वर्ग, अवलंबून असणारा कर्मचारी वर्ग अशा निर्णयामुळे कोलमडून पडेल.’

सततच्या वेळ बदलामुळे व्यापारावर परिणाम होत आहे. कामगार वर्ग घाबरून लवकर बाहेर पडतो. काही कामगार मूळ गावी गेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तसेच घाऊक भुसार बाजारातील व्यापारी पेढय़ा सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानागी द्यावी, असे मार्केटयार्डातील भुसार व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी नमूद केले.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या र्निबधांनुसार दुपारी चार वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश दिले असून सोमवारी  महात्मा गांधी रस्त्यावर तुरळक वर्दळ होती.