राज्यभरातील पालकांकडून मागणी करण्यात आल्याने ‘टिलीमिली’ या शैक्षणिक मालिके चे स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या मालिके साठी राज्य शासनाने निधी दिलेला नसून, एमके सीएल नॉलेज फाउंडेशनने मालिके साठी संपूर्ण खर्च केल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक सावंत यांनी दिली.

एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या गुणवत्ता परीक्षण आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ‘टिलीमिली’ ही मालिका सह्य़ाद्री वाहिनीवर सुरू केली आहे. २० जुलै ते २६ सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक इयत्तेचे साठ पाठ साठ भागांमधून दाखवले जाणार आहेत.

‘‘टिलीमिली’ मालिका तयार करण्यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नाही. दूरदर्शनच्या निकषांप्रमाणे २५ मिनिटांपेक्षा मोठा भाग ठेवता येत नाही.

एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनने प्रत्येक भागासाठी ११ हजार रुपयांप्रमाणे ४८० भागांचे ५५ लाख रुपये दूरदर्शनकडे भरले आहेत,’ असे सावंत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पालकांसह दूरचित्रवाणीवर मालिका पाहावी हाच मूळ उद्देश आहे. मात्र, ही मालिका मोबाईलवरही पाहण्याची सुविधा देण्याची मागणी पालकांकडून करण्यात आल्याने मालिकेचे स्वतंत्र अ‍ॅप विकसित करण्यात आले.

मालिके च्या भागांसह अ‍ॅपमध्ये स्वाध्यायपत्रिका, प्रश्नमंजूषा, पूरक उपक्रमही देण्यात आले आहेत. त्यामुळे मुलांना प्रत्येक भागावर आधारित परीक्षा देण्याचीही सुविधा आहे, असे सावंत यांनी सांगितले.

अ‍ॅप सशुल्क का?

अ‍ॅपवर मालिकेचे भाग पाहण्यासाठी ३१ जुलैपर्यंत दोनशे रुपये आणि ३१ जुलैनंतर तीनशे रुपये शुल्क आहे. हे शुल्क पहिल्या सहामाही सत्रासाठी आहे.  समाजमाध्यमावर मालिके चे भाग मोफत पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास पूरक उपक्रम, मूल्यमापन आदी सुविधा देता येणार नाहीत. या मर्यादांचा विचार करता अ‍ॅप करण्याची गरज होती, तसेच एकू ण खर्चाचा विचार करता अ‍ॅप मोफत ठेवता येणे शक्य नाही, असे सावंत यांनी सांगितले. अ‍ॅप घेण्याची कोणतीही सक्ती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.