‘सायबर मीडिया रिसर्च’चा अहवाल

भारतातील बहुसंख्य नागरिक जागे असतानाच्या वेळेतील वार्षिक सुमारे अठराशे तास स्मार्टफोन वापरासाठी खर्च करत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. सायबर मीडिया रिसर्च आणि एका स्मार्टफोन उत्पादक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ संवाद साधण्यासाठी वापरला जाणारा फोन स्मार्ट झाला आहे आणि त्याने मानवी जीवनाच्या सर्वच पैलूंमध्ये अप्रत्यक्ष सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. वीजबिल भरण्यापासून चित्रपटाचे तिकीट काढण्यापर्यंत आणि सुट्टीचे नियोजन करण्यापासून दैनंदिन गरजेच्या धान्य, भाजीपाल्याच्या खरेदीपर्यंत सर्वच कामे स्मार्टफोनच्या मदतीने सहज होऊ लागली आहेत.

या पार्शभूमीवर स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या ग्राहकांबाबत केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुसंख्य नागरिकांनी स्मार्टफोनशिवाय राहणे अशक्य असल्याचे सांगितले आहे. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींपैकी ७५ टक्के किशोरवयीन मुलांकडे स्मार्टफोन आहेत. त्यांपैकी ४१ टक्के मुलांकडे शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीपासून स्मार्टफोन आहेत, असे दिसून आले आहे.

भारतातील आठ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. आठ शहरांमधील विविध वयोगटातील सुमारे दोन हजार व्यक्तींनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. त्यांपैकी ३६ टक्के महिला तर ६४ टक्के पुरुष होते. स्मार्टफोनवरचे अवलंबित्व वाढल्याचे सर्व वयातील वापरकर्त्यांनी मान्य केले आहे. स्मार्टफोनच्या मदतीने नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे सोपे झाल्यामुळे ३० टक्क्य़ांहून कमी व्यक्ती महिन्यातून एकापेक्षा अधिक वेळा परस्परांना प्रत्यक्ष भेटतात. मित्र आणि कुटुंबीयांसोबत असताना एकदाही स्मार्टफोन पाहिल्याशिवाय सलग पाच मिनिटेही राहू शकत नसल्याची कबुली या व्यक्तींनी दिली आहे. स्मार्टफोनच्या वापराचे प्रमाण असेच राहिल्यास किंवा वाढल्यास मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका आहे.