छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या युद्धनीतीचा लष्करी जवान अभ्यास करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लष्कराच्या युवा जवानांचा चमू हिंदूवी स्वराज्याची तीर्थक्षेत्रे असलेल्या किल्ल्यांना सायकलवरून भेट देण्यासाठीच्या मोहिमेस सोमवारी प्रारंभ झाला.
औंध येथील लष्करी तळावर स्थानीय माहिती अधिकारी ब्रिगेडियर आलोक चंद्रा यांनी हिरवा झेंडा दाखविताच सकाळी साडेसहा वाजता या मोहिमेचा श्रीगणेशा झाला. या संघामध्ये एक अधिकारी आणि दहा जवानांचा समावेश आहे. कॅप्टन अरिवद कुमार सिंग या संघाचे नेतृत्व करीत असून मराठा लाईट इन्फ्रंट्रीच्या जवानांचा सहभाग आहे. पुढील दहा दिवसांत हा संघ लोहगड, रायगड, तोरणा, राजगड आणि सिंहगड अशा सहा किल्ल्यांना भेट देणार आहे. त्यासाठी जवळपास ३७५ किलोमीटर अंतराचे सायकलिंग करणार असून २५ मार्च रोजी या मोहिमेची सांगता होणार आहे.
मराठा युद्धनीतीची तीर्थस्थाने असलेल्या किल्ल्यांना भेट देण्याची मोहीम लष्करातर्फे आखण्यात आली आहे. तुटपुंजी साधने असतानाही अमर्याद धाडसाच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याचा पराभव केला होता. संकटाचे संधीमध्ये रूपांतर करण्याचे कसब आणि गनिमी कावा या युद्धतंत्राचे कौशल्य मर्यादित मावळ्यांचे सामथ्र्य शतगुणित करीत असे. किल्ल्यांना भेट देण्याबरोबरच हे जवान युद्धकौशल्याचा अभ्यास करणार आहेत. किल्ले परिसरातील स्थानिक लोकांशी संवाद साधून युवकांना लष्कराकडे आकर्षित करणे हादेखील या मोहिमेचा एक उद्देश आहे.