आमदार होण्यासाठी आतूर असलेल्या शिवसेनेच्या सीमा सावळे व सुलभा उबाळे या दोन ‘रणरागिणी’ नगरसेविका शनिवारी पिंपरी पालिका सभेत ताथवडे गावच्या विकास आराखडय़ावरील चर्चेच्या वेळी एकमेकांना भिडल्या. परस्परांवर सूचक शेरेबाजी केल्याने दोघींमध्ये वाक्युध्द जुंपले असतानाच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केलेल्या विशिष्ट टिप्पणीमुळे सावळे भडकल्या व सभागृहातील चर्चेचा नूरच पालटला. बहल यांचा ‘उद्धार’ करत सावळे त्यांच्या अंगावर धावून गेल्या. सुरुवातीला आक्रमक असलेले बहल त्यांचा संताप पाहून मवाळ झाले व त्यांनी सावळेंची माफी मागितली. या गदारोळात आराखडा बहुमताने मंजूर करण्यात आला.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास सात तास चाललेल्या सभेत वादग्रस्त ताथवडे विकास आराखडा मंजुरीसाठी होता. त्यावरील चर्चेत आराखडय़ातील फेरफार, आरक्षणे बदलण्यावरून झालेली दुकानदारी, नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे यांनी केलेले गैरव्यवहार, गरीब शेतकरी म्हणून धनदांडग्या श्रीचंद आसवानी यांच्यावर झालेली मेहरनजर अशा विविध मुद्दय़ांवर वादळी चर्चा झाली. उबाळे यांनी आराखडय़ातील भ्रष्टाचाराविषयी कडक भाष्य करतानाच सावळे यांना उद्देशून काही बोचरी विधाने केली, त्यामुळे सावळे संतापल्या. प्रत्युत्तरादाखल त्यांनी तशाच भाषेत शेरेबाजी केली. अरे ला कारे म्हणण्याचा दोघींचा स्वभाव असल्याने त्यांच्यात जुंपली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मजा पाहत होते. सेनेचे नगरसेवक बाबा धुमाळ व धनंजय आल्हाट यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, दोघींचा पारा चढलेला असल्याने भांडण वाढत होते. वैतागून धुमाळ निघून गेले. सभागृहात तणाव निर्माण झाला असताना बहल बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी सावळे यांना उद्देशून शेरेबाजी सुरू केली. ‘आम्ही व्यवसाय करतो, ब्लॅक मेल करत नाही. सकाळपासून झोळी घेऊन फिरता, उकिरडय़ात हात घालता, बिल्डरांची चापलुसी करता, तुम्हाला घाबरून उपसूचना द्यायच्या नाहीत का, कोर्टात जा नाहीतर कुठेही जा,’ अशाप्रकारची विधाने बहल करताना त्यांनी केलेल्या विशिष्ट टिप्पणीने सावळे भडकल्या. बहल यांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्नात असताना राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविकांनी सावळेंना अडवले. पक्षनेत्या मंगला कदम सावळेंच्या शेजारीच जाऊन बसल्या. सावळेंचा रुद्रावतार पाहून बहलांनी आधीची भाषा बदलली. ‘मी तुम्हाला बोललोच नाही, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, तुम्हाला माझे शब्द लागले असतील तर मी ते मागे घेतो, माफी मागतो,’ अशा शब्दात बहल यांनी नमते घेतले. त्यानंतर, सभेचे कामकाज सुरू झाले.

आराखडय़ात १६ उपसूचना
ताथवडे गावचा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी महापौरांना मतदान घ्यावे लागले. ५७ विरूध्द ९ अशा फरकाने तो मंजूर झाला. आराखडय़ासाठी १६ उपसूचना दाखल झाल्या, मात्र, त्यातील तपशील गुलदस्त्यात राहिला. काही नगरसेवकांनी त्यावर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाईने सभेचे काम पूर्ण करण्यात आले.