लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पावसाळा पूर्व कामाअंतर्गत नालेसफाईला सुरुवात झाली आहे. ही कामे १० मे पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त, प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. मात्र, पावसाळापूर्व कामे संथ गतीने सुरू असल्याने मुदतीमध्ये नालेसफाईची कामे होणार का आणि निविदा ४५ टक्के कमी दराने आल्याने कामांच्या गुणवत्तेबाबतचा प्रश्न कायम राहणार आहे.

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळा पूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, पावसाळी गटारे, वाहिन्यांची स्वच्छता केली जाते. मात्र, ही कामे पावसाळा तोंडावर आला तरी सुरूच असतात, असे चित्र अलीकडच्या काही वर्षातील आहे. नालेसफाईची कामे उशिरा सुरू होत असल्याने आणि ती रखडल्याने वेळोवेळी या कामांना मुदतवाढ द्यावी लागल्याचे प्रकारही पुढे आले आहेत. कागदावर कामे केल्याचे दाखवून ठेकेदारांकडून पैसे लाटले जात असल्याने पावसाळ्यात अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या घटना घडल्याने महापालिकेला अनेकवेळा टीकेला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर यावेळी लवकर नालेसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन निविदा प्रक्रिया लवकर राबविण्यात आली.

आणखी वाचा-‘पुण्या’साठी राहुल, प्रियंका गांधी यांचा ‘रोड शो’; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्याही सभा

पावसाळा पूर्व कामे सुरू झाली असली तरी अद्यापही कामांचा वेग वाढलेला नाही. पावसाळी गटारांची स्वच्छता, नाल्यांची सफाई संथ गतीने सुरू आहे. मात्र कामांचा वेग वाढेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. ही सर्व कामे १० मे पर्यंत पूर्ण करण्याची सूचना संबंधित विभागांना करण्यात आली आहे. महापालिकेची सर्व पंधरा क्षेत्रीय कार्यालये, पाच परिमंडळ उपायुक्तांकडून या कामांवर देखरेख ठेवली जाणार आहे.

महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाले आणि पावसाळी गटारे साफ करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्याबाबतचे पूर्वगणनपत्रकही मंजूर करण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील कचरा, वाढलेले गवत यांसह पाण्याच्या प्रवाहात येणारे अडथळे काढण्याची कामे याअंतर्गत केली जाणार आहेत. तसेच पावसाळी वाहिन्यांची साफसफाई केली जाणार आहे. महापालिकेने निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर ठेकेदारांनी १० ते ५३ टक्के इतक्या कमी दराने निविदा भरल्या होत्या. पूर्वगणन पत्रकापेक्षाही त्या कमी दराने असतानाही त्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कामांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आणखी वाचा-एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?

नाल्यांची एकूण लांबी- ६४७ किलोमीटर
कल्व्हर्टची संख्या- ७४२ कल्व्हर्ट
लहान बंधारे- १२
पावसाळी वाहिन्यांची लांबी- ३२५ किलोमीटर
चेंबरची संख्या- ५५ हजार ३००

नालेसफाईची कामे १० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार यावेळी कामे मुदतीमध्ये पूर्ण होतील. कामांचा अहवाल देण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. कामे गुणवत्तापूर्ण असतील. -डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका