२५ वर्षांनंतर नवे अत्याधुनिक डबे; रंगसंगतीही बदलणार

पुणे-मुंबई दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांची लाडकी गाडी असलेल्या डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचे रूपडे नव्या वर्षांत पालटणार आहे. गाडीला २५ वर्षांनंतर नवे अत्याधुनिक व वाढीव डबे जोडण्यात येणार असून, रंगसंगतीतही आकर्षक बदल करण्यात येणार आहेत.

पुणे-मुंबई प्रवासासाठी १ जून १९३० रोजी सुरू झालेली डेक्कन क्वीन अल्पावधीतच लोकप्रिय झाली. पुणे-मुंबई विनाथांबा असलेल्या या पहिल्या गाडीची नोंद लिम्का बुकमध्ये झालेली आहे. त्याचप्रमाणे तिला ‘आयएसओ’ गुणवत्तेचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. सुसज्ज ‘डायनिंग कार’ हेही या गाडीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. पुणे-मुंबई रोजचा प्रवास करणारे नोकरदार, व्यापारी, वकील, मंत्रालयीन अधिकारी यांच्यासाठी ही गाडी ‘सेकंड होम’ म्हणूनही ओळखली जाते. नव्वदाव्या वर्षांत या गाडीचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार जानेवारी २०२० मध्ये डेक्कन क्वीन नव्या स्वरूपात धवणार आहे.

सध्या गाडीला १७ डबे असून, १९९५ पासून हेच डबे घेऊन ती धावते आहे. मात्र, आता गाडीला एलएचडी या प्रकारातील अत्याधुनिक २० डबे जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या डब्यांमुळे प्रवास अधिक आरामदायक होऊ शकणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांच्या दृष्टीने हे डबे सुरक्षित असणार आहेत. त्याचप्रमाणे बाहेरच्या बाजूने गाडीला आकर्षक रंगसंगती देण्याबाबतही विचार करण्यात येत आहे. गाडीमध्ये सध्या एक सुसज्ज डायनिंग कार आहे. त्या माध्यमातून प्रवाशांना खानपान व्यवस्था पुरविण्यात येते. त्याचप्रमाणे डायिनग कारमध्ये बसूनही प्रवाशांना खाद्यपदार्थाचा अस्वाद घेता येतो. डायनिंग कारमध्ये ३२ आसनांची व्यवस्था वातानुकूलित करण्यात येणार आहे.

सोनेरी किंवा चंदेरी रंग हवा..

डेक्कन क्वीनला ‘गोल्डन ट्रेन’ म्हणूनही एक ओळख आहे. त्यामुळे गाडी सोनेरी किंवा चंदेरी रंगात सजवावी, अशी मागणी सध्या करण्यात येत आहे. यापूर्वी या गाडीला नेव्ही ब्ल्यू, तपकिरी, पांढरा, निळा-पांढरा आदी वेगवेगळे रंग देण्यात आले होते. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा याबाबत म्हणाल्या, की जानेवारीत डेक्कन क्वीनचे डबे आणि रंगसंगती बदलण्यात येणार असल्याने सोनेरी किंवा चंदेरी रंगाची मागणी आम्ही केली आहे. या गाडीचे वैशिष्टय़ असलेली डायनिंग कार पूर्णपणे वातानुकूलित करावी. त्यात अतिरिक्त रेस्टॉरन्ट असावे आणि डब्यांची संख्या आणखी वाढवावी, अशा मागण्याही आम्ही रेल्वेकडे नोंदविल्या आहेत.