पुणे : मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये देशाच्या बहुतांश भागात उष्णतेच्या तीव्र लाटांनी कहर केला. या दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्वमोसमी पावसावरही मोठा परिणाम दिसून आला. महाराष्ट्रासह देशात बहुतांश भागात पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण यंदा सरासरीच्या तुलनेत कमी राहिले. देशात सुमारे ३० टक्क्यांहून अधिक पाऊस कमी पडला. उन्हाच्या झळा सर्वाधिक तीव्र असलेल्या उत्तर-पश्चिम भारतात पावसाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये देशाच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मार्चच्या सुरुवातीपासूनच देशाच्या उत्तरेकडील भागात तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे सरकला. त्यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंडिगड, उत्तर प्रदेशासह हिमालयीन विभागातही उष्णतेच्या तीव्र लाटा निर्माण झाल्या. निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे उष्णतेच्या लाटा अधिकाधिक तीव्र होत होत्या. त्याचा परिणाम गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांवर झाला. मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून वाढलेला कमाल तापमानाचा पारा एप्रिलच्या अखेपर्यंत आणि सध्या मे महिन्याच्या सुरुवातीलाही कायम राहिला. या कालावधीत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले.
बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे, चक्रीवादळे, कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पूर्वमोसमी पावसाची हजेरी असते. मात्र, यंदा मार्च-एप्रिलमध्ये मध्य भारतावर त्याचा प्रभाव कमी राहिला. अगदी तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी होती. त्यामुळे मध्य भारतामध्ये सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक पाऊस कमी झाला. दक्षिण भारत, द्वीपकल्प आणि पूर्वोत्तर भागातील राज्यांमध्ये मात्र पूर्वमोसमी पाऊस अधिक राहिला.
असमानता कशी?
पश्चिमेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण कमी राहिल्याने उत्तर तसेच उत्तर-पश्चिम भागातील राज्यात पूर्वमोसमी पाऊस कमी होता. हिमालयीन विभागासह, राजस्थान, पंजाब, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांत पूर्वमोसमी पाऊस मार्च आणि एप्रिल महिन्यात उणा ठरला. बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प, कमी दाबाचे क्षेत्र आदींचा प्रभाव महाराष्ट्र किंवा मध्य भारतापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह जवळील राज्यांत पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण कमी राहिले असले, तरी पूर्व किंवा पूर्वोत्तर राज्यांवर त्याचा प्रभाव होऊन या भागात पूर्वमोसमी पाऊस सरासरी ओलांडून पुढे गेला.
या वर्षी काय झाले?
देशाच्या पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उत्तर भारतात अवकाळी किंवा पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावत असतो. मार्च आणि एप्रिल महिन्यात या वाऱ्यांचा प्रभाव कमी राहिला. त्यामुळे उत्तर-पश्चिम भारतामध्ये पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यांनी कमी राहिले.