वेश्या वस्तीत राहणाऱ्या व समाजापासून दुर्लक्षित असणाऱ्या महिलांशी संवाद वाढविण्यासाठी पोलिसांनीच एक पाऊल पुढे टाकले अन् त्यातूनच या महिलांनी आयुष्यातील सर्व वेदना क्षणभर दूर ठेवून दिवाळी साजरी केली. रांगोळ्या, पणत्या व दिवाळीच्या फराळाने बुधवार पेठेतील या वस्तीचे रूप शनिवारी काही निराळेच झाले होते.
शहर पोलिसांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वेश्या वस्तीमधील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वत: दारासमोर रांगोळ्या रेखाटल्या व पणत्याही पेटविल्या. त्याचप्रमाणे पोलिसांच्या वतीने या महिलांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. पोलीस उपायुक्त मकरंद रानडे, सहायक आयुक्त प्रशांत खैरे, फरासखाना ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे त्या वेळी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या महिलांना काही गोष्टींबाबत सूचना केल्या होत्या. त्याबाबत त्यांनी विश्वास दाखविला. त्याचे उत्तर म्हणून व एक चांगला संवाद घडविण्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे बर्गे यांनी सांगितले.