राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीप घुले यांचा अपघातात मृत्यू

रिक्षासमोर अचानक आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी जोरात ब्रेक लावल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात डॉ. दिलीप सोपानराव घुले (वय ४६) यांचा मंगळवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

रिक्षासमोर अचानक आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी जोरात ब्रेक लावल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात डॉ. दिलीप सोपानराव घुले (वय ४६, रा. फ्लॅट नं २०५, २०६, राजयोग सोसायटी, पद्मावती) यांचा मंगळवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पुणे-सातारा रस्त्यावर भापकर पेट्रोल पंपाजवळ सकाळी ही घटना घडली. डॉ. घुले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश ज्येष्ठ नागरिक संघ सेलचे अध्यक्ष होते. या प्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथे एका बैठकीसाठी डॉ. घुले हे मंगळवारी जाणार होते. पण, त्यांच्या मोटारीचा चालक सुट्टीवर असल्यामुळे मंगळवारी सकाळी ते डेक्कन क्वीनने मुंबईला जाणार होते. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास ते घरातून निघाले. पद्मावती कॉर्नरजवळून त्यांनी रिक्षा पकडली. रिक्षावाल्यास त्यांनी पुणे स्टेशनला जायचे असल्याचे सांगितले. पुणे-सातारा रस्त्याने स्वारगेटकडे निघाले असता भापकर पेट्रोल पंपासमोर रिक्षाला अचानक एक मोटारसायकलस्वार आडवा आला. त्यामुळे रिक्षा चालक धोंडिबा मसाजी शिंदे यांनी जोरात ब्रेक लावले. त्यामुळे रिक्षा उलटली आणि रिक्षा चालक शिंदे बाहेर फेकले गेले. मात्र, डॉ. घुले हे रिक्षातच अडकले होते. रस्त्यावरील नागरिकांनी दोघांना दुसऱ्या रिक्षामधून बिबवेवाडी येथील राव हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल केले. डॉ. घुले यांच्या पोट, छाती आणि डोक्याला मार लागला होता. त्यांच्यावर उचपार सुरू असताना दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वसंत सोनवणे, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर घटनास्थळी गेले. निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घुले यांच्यावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. घुले यांच्या मागे पत्नी, मुलगी ऐश्वर्या, मुलगा मानस, वडील सोपानराव, आई, भाऊ असा परिवार आहे. डॉ. घुले हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक संघ सेलचे अध्यक्ष होते. त्यापूर्वी त्यांनी प्रदेश डॉक्टर सेलचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. डॉ. घुले हे एम डी आयुर्वेद होते. त्यांची मुलगी ऐश्वर्या ही वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr dilip ghule died in accident

ताज्या बातम्या