गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव-मारुलकर यांना यंदाचा स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार जाहीर झाला आहे. ३१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १३ सप्टेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते डॉ. अलका देव-मारुलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ या वेळी उपस्थित राहणार आहेत, असे नातू फाउंडेशनचे शारंग नातू आणि गानवर्धन संस्थेचे विश्वस्त प्रसाद भडसावळे यांनी कळविले आहे.
ग्वाल्हेर, जयपूर आणि किराणा या तीनही घराण्याच्या शैलीदार गायनाची परंपरा समर्थपणे सादर करणाऱ्या डॉ. अलका देव-मारुलकर यांना वडील पं. राजाभाऊ देव आणि पं. मधुसूदन कानेटकर यांच्याकडून तालीम मिळाली. उपशास्त्रीय संगीतावरील त्यांचे प्रभुत्व उल्लेखनीय आहे. ‘को-रिलेशन ऑफ द बंदिश इड विथ द रागाज अँड द स्कोप फॉर द नरवसाज इन बंदिशीज’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. संपादन केली आहे. जोगेश्री, आनंदकल्याण, पंचमगौरी या रागांची निर्मिती केली असून त्यांनी देशात आणि परदेशात संत कबीर आणि सूरदास यांच्या रचनांवर आधारित कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे.