फार मोठी कुलमहती असणारा गुलाब घरी आणण्याचा संकल्प आपण नवीन वर्षांच्या सुरुवातीस केला आहे. आपल्या बागेचा सदस्य होणाऱ्या या सम्राटाच्या स्वागताची शाही तयारी हवी. सहा ते आठ तास उन्हाची जागा हवी. कुंडीत लावायचा झाल्यास चांगली भारदस्त निदान एक फूटभर व्यासाची आणि तेवढीच खोल कुंडी हवी. जमिनीत लावायचा झाल्यास दीड फूट लांब,  दीड फूट रुंद आणि दीड फूट खोल खड्डा हवा. गुलाबासाठी सेंद्रिय माती वापरताना त्यामध्ये कोकोपीथ आणि नीमपेंड घालून कुंडी किंवा खड्डा भरून ठेवावा. आपल्या आवडीच्या रंगाचा हायब्रीड हीज वा फ्लोरिबंडा गुलाबाचे रोप आणता येईल. नामांकित रोपवाटिकेतूनच रोपं आणावीत. रोपं आणल्यावर आठ-दहा दिवस जेथे रोप लावायचे त्या जागी ठेवून पाणी घालावे. रोपास नवीन जागेची सवय झाली की रोपाची पिशवी अलगद कापावी. मुळातली घट्ट माती मोकळी करावी आणि शक्यतो सायंकाळी रोपाची लागवड करावी. रोप लावल्यावर त्यास पाणी द्यावे. गुलाबास खूप पाणी आवडत नाही, पण सदैव ओल लागते. त्यामुळेच मातीत कोकोपीथ जरूर घालावे. रोपास नवी फुटं यायला लागली की शेणखत, स्टेरामील, बोनमील अथवा कंपोस्ट यापकी एकाचा हलका डोस द्यावा. प्राणिजन्य खत गुलाबास आवडते. पहिली कळी आल्यावर दुसरा डोस द्यावा, ज्यामुळे फुलाचा तजेला वाढेल. खत घातल्यावर कुंडीत किंवा रोपाच्या आजूबाजूला तण येणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर तणच फोफावेल.

फुलांचा बहर येऊन गेल्यावर हलकी छाटणी करावी. फुलांचे दांडे कापल्यावर जोरकस नवीन फुटवे येतात. झाडांचा आकार छान दिसावा यासाठी एकमेकांना छेद देणाऱ्या फांद्या, निस्तेज फांद्या, पाने कापून टाकावीत. गुलाब रोपांचं आयुष्य खूप असल्याने फांद्या नंतर खूप जाड होतात. त्या जमिनीपासून दहा-बारा इंचावर कापाव्यात. कलमी गुलाबांवर कीड पडण्याचा धोका जास्त असतो. जमिनीत महिन्यातून एकदा नीमपेंड घालावी. अर्धा लीटर पाण्यात दोन-तीन चहाचे चमचे नीमतेल घालून एक चमचा निरमा पावडर घालून ढवळावे आणि ते पाणी फवारावे. आठवडय़ात एकदा पानांवर दाबाने पाणी फवारावे. जेणेकरून बारीक कीड धुतली जाईल. गुलाबाच्या रोपाच्या आजूबाजूच्या जागेची निगा राखावी. आपण जसे उन्हाळय़ात पन्हं, लिंबू सरबत पितो तसेच गुलाबाला खत आवडते. शेणात त्याच्या दहापट पाणी मिसळून ते पाणी एका झाडास एक मग भरून (अर्धा लीटर) घालावे. हे पेय गुलाबास आवडते. फुलांचा तजेला वाढतो. केलेले पाणी इतर झाडांना दिल्यास तीही तरारतील.

Jupiter and Venus will unite after 24 years
आर्थिक समस्या उद्भवणार? २४ वर्षानंतर गुरु आणि शुक्र एकत्र होणार अस्त; ‘या’ राशीच्या व्यक्तींचे भाग्य देणार नाही साथ
Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान

आता कलमी गुलाब म्हणजे काय तर देवकीचे बाळ यशोदेने वाढवायचे. साध्या गुलाबावर आपल्याला हव्या त्या रंगाच्या गुलाबाचा डोळा भरायचा. मातृरोपाच्या जाडसर फांदीला ‘ळ’ (इंग्रजी अक्षर ‘टी’) आकाराचा छेद द्यायचा. हव्या त्या रंगाच्या फुलाच्या मातृरोपावरून पानाजवळचा सशक्त डोळा, त्याच्या वर-खाली एक सेंटिमीटर त्वचा खोडापासून विलग करून हा डोळा ‘टी’ आकाराच्या विलग केलेल्या त्वचेच्या आत अलगद सरकवायचा. जेणेकरून डोळय़ाच्या त्वचेचा आतील भाग मातृरोपाच्या खोडास बिलगेल. ही सरकवलेली चकती डोळा मोकळा ठेवून प्लॅस्टिकने घट्ट बांधावी. रोपवाटिकेत अशाप्रकारे लाखो गुलाबवृद्धी करतात. मातेशी घट्ट बंध जुळल्यानंतर डोळा जोम धरेल, फुटेल, तरारेल, तेव्हा नाती जपतो तसे त्यास जपावे. जोरकस धक्का, सतत वाऱ्याचा मारा लागून फुटं हलणार नाही हे पाहावे. मातृरोपाचे काम फक्त पोषण करणे, त्याची फांदी वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.

जातिवंत अश्व, जातिवंत श्वान यांचा मान मोठा पण रस्त्यातले मोती, काळू, स्पायसी, झिपरीही लळा लावतात. तसे हायब्रीड हीज, फ्लोरिबंडाबरोबर गुलकंदाचा गुलाबी, पिवळा, मोतीया, लाल, पांढरा, देशी गुलाब लावायला हरकत नाही. हे कणखर प्रवृत्तीचे, सतत थोडी, थोडी अल्पजीवी फुलं देत राहतात. एकदम खूप कापण केल्यास त्या दिवसापासून ४०-४५ दिवसांनी भरभरून फुलतात. या गुलाबाची करंगळीएवढी जाड फांदी तिरका छाट देऊन कापावी. मातीत खोचावी. वरून प्लॅस्टिक ग्लास किंवा पिशवी उपडी घाला आणि टोकास मातीचा गोळा लावा. फांदीस फूट आली की नवीन कुंडीत लावा. देशी गुलाब रोपवाटिकेत मिळत नाहीत. ज्या मत्रिणींकडे असतील त्यांनी रोप करून संक्रांतीस लुटावीत. या गुलाबाचा सुगंध मोहक असतो.

माझी आजी खिरींमध्ये, ओल्या नारळाच्या करंज्यांमध्ये गुलाब पाकळय़ा घालत असे आणि आईकडे खडीसाखर व घरच्या गुलाबपाकळय़ांचा गुलकंद असे. काचेच्या पसरट थाळीत पाणी घालून फुले तरंगत ठेवल्यास सुंदर दिसतात, त्वचेसाठी ताजे गुलाबपाणी मिळते. ग्लॅडिएटरसारख्या दीर्घजीवी फुलांच्या पुष्परचना करता येतात.  घरातील गुलाबफुले खूप आनंद देतात, पण त्याबरोबर काटेही असतात हे विसरू नका. आनंदासाठी काटय़ांना योग्य रीतीने हाताळायला शिकायचे हीच गुलाबाची खरी शिकवण!

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)