करोना संसर्गामुळे शिक्षण संस्थांचा नवा कल

पुणे : करोना संसर्गामुळे लागू कराव्या लागलेल्या टाळेबंदीने रोजगार निर्मितीचा प्रश्न निर्माण झाला. मात्र या काळात विद्यार्थ्यांना नोकरी (प्लेसमेंट) आणि कार्यानुभव (इंटर्नशिप) मिळण्याचा नवा कल दिसून आला आहे. शिक्षण संस्थांनी कंपन्यांशी समन्वय साधून नोकरी आणि कार्यानुभवासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवल्याने विद्यार्थ्यांना संधी प्राप्त झाल्या आहेत.

दरवर्षी शिक्षण संस्थांमध्ये नोकरी आणि कार्यानुभवासाठी विद्यार्थी निवडण्याची प्रक्रिया शिक्षण संस्था आणि खासगी कंपन्यांच्या समन्वयातून केली जाते. त्यात खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी महाविद्यालयात येऊन थेट संवाद साधून, मुलाखती घेऊन पात्रताधारक विद्यार्थ्यांची निवड करतात. मात्र मार्चमध्ये दाखल झालेल्या करोना विषाणूच्या संसर्गामुळे या प्रक्रियेला फटका बसला. मात्र, शिक्षण संस्थांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना नोकरी आणि कार्यानुभव मिळण्यासाठीची प्रक्रिया राबवली. ऑनलाइन प्रक्रियेतून तंत्रज्ञान, उत्पादन अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याची माहिती काही महाविद्यालयांनी दिली.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर म्हणाले, ‘महाविद्यालयातील कार्पोरेट रिसोर्स सेल या स्वतंत्र विभागामार्फन ऑनलाइन प्लेसमेंट मोहीम राबवण्यात आली. त्यात दीडशेहून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. या ऑनलाइन प्रक्रियेतून प्लेसमेंटचे ९५ टक्के  उद्दिष्ट पूर्ण झाले.

आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलातील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाने औषधनिर्माण, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने मुलाखतीची प्रक्रिया राबवली. तर व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना व्हच्र्युअल इंटर्नपशिप देण्यात आली. यंदा नोकरी मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना १० लाखांचे पॅकेज मिळाल्याची माहिती प्लेसमेंट विभागाच्या अधिष्ठाता डॉ. जस्मिता कौर यांनी दिली.

टाळेबंदीच्या काळात बीएनसीए रिसोर्स सेंटर अँड कन्सल्टन्सी सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तसेच काही कंपन्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना कार्यानुभवाचे काम घरातूनच (वर्क फ्रॉम होम) करण्याची सोय करण्यात आली. संसर्गामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनी मूळ गावी गेल्याने कार्यानुभवाची संधी त्यांच्या मूळ गावीच मिळण्याची सोय करण्यात आली, अशी माहिती भानूबेन नानावटी वास्तुकला महाविद्यालयाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. महेश बांगड यांनी दिली.

‘ऑनलाइन’चा कल भविष्यात सुरू राहणे शक्य

ऑनलाइन मुलाखतींच्या नव्या प्रक्रियेशी जुळवून घ्यावे लागत आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार मुलाखती होण्यासाठी दहा जणांचा चमू कार्यरत आहे. मुलाखत ऑनलाइन पद्धतीने होतानाही विद्यार्थ्यांना व्यवस्थित पोशाख परिधान करणे, वेळेच्या आधी ऑनलाइन येऊन वाट पाहणे, नियमानुसार कॅमेरा सुरू ठेवणे, ऑनलाइन मुलाखतीदरम्यान अन्य कोणी न दिसण्याची काळजी घेणे असे नियम पाळावे लागतात.  ऑनलाइन पद्धतीतून विद्यार्थी, महाविद्यालय प्रशासन आणि कंपन्या या तिन्ही स्तरावर वाचणारा वेळ आणि खर्चात होणारी बचत महत्त्वाची आहे. तसेच उत्पादन क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या तातडीच्या गरजांमुळे प्रत्यक्ष मुलाखतीही घेत असल्याचे ताथवडेच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चीफ प्लेसमेंट ऑफिसर संतोष बोर्डे यांनी सांगितले.