पिंपरी: शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास होता. नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असणारे नगरविकास खाते उध्दव यांनी शिंदे यांच्याकडे दिले होते. त्याच शिंदे यांनी विश्वासघात केला. तकलादू कारणे देत, ईडीच्या कारवाईला घाबरून आणि पदाच्या लालसेने आमदार-खासदार पक्ष सोडून पळाले, अशी टीका शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार सचिन अहिर यांनी केली.
शिवसेनेच्या शिरूर, हवेली, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अहिर म्हणाले की, ज्यांना राजकीय दिशा दिली, पक्षाची ताकद दिली. त्यांच्याकडूनच पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली, त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. उध्दव ठाकरे यांना ज्यांनी-ज्यांनी त्रास दिला, ते त्यांच्या कर्माने जातील. त्यांना महत्त्व देऊ नका. शिवसेना व ठाकरे कुटुंब वेगळे होऊ शकत नाही. आगामी निवडणुका शिवसेना ‘धनुष्यबाण’ या चिन्हावरच लढवणार आहे. कोणाला आमदार करायचे आणि कोणाला खासदार करायचे, याची ताकद शिवसैनिकांमध्ये काल होती आणि आजही आहे, असे अहिर यावेळी म्हणाले.



