नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी शहराच्या विविध हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी ‘थर्टी फर्स्ट’च्या जंगी पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाटर्य़ासाठी आयोजकांना विविध परवान्यांबरोबरच करमणूक शुल्क विभागाचा परवानाही मिळवावा लागतो. सध्या शहरात थंडीचा चांगलाच कडाका जाणवत असला, तरी हा परवाना मिळविताना मात्र आयोजकांना चांगलाच घाम फुटत असल्याचे दिसते आहे. ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून हात ओले झाल्याशिवाय परवानाच मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.
‘थर्टी फर्स्ट’च्या पाटर्य़ासाठी यंदा पहाटे पाचपर्यंतची वेळ देण्यात आल्यामुळे यंदा पाटर्य़ा चांगल्याच रंगणार असल्याचे दिसते आहे. वेळ अधिक असल्याने पाटर्य़ामध्ये करमणुकीचे विविध कार्यक्रम ठेवण्याकडेही आयोजकांचा कल आहे. या पाटर्य़ासाठी पोलीस व वाहतूक पोलिसांचा परवाना घ्यावाच लागतो. पार्टीमध्ये मद्याचा वापर होणार असल्यास उत्पादन शुल्क विभागाचा परवाना गरजेचा असतो. त्याचप्रमाणे करमणुकीचे कार्यक्रम किंवा ध्वनिक्षेपक लावण्यासाठी करमणूक शुल्क विभागाचा परवाना घ्यावा लागतो. प्रत्येक पार्टीमध्ये करमणुकीचे कार्यक्रम असतातच. त्यामुळे सर्वच पाटर्य़ाच्या आयोजकांना या परवान्याची आवश्यकता असते.
करमणूक शुल्क विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून हा परवाना मिळविण्यासाठी आयोजकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, परवाना देताना वेगवेगळी कारणे काढून अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाल्याशिवाय परवानाच मिळत नाही. काही मंडळींकडून मोठमोठय़ा रकमेची मागणी करण्यात येते. मागणी पूर्ण न केल्यास परवाना मिळणारच नाही, अशी भूमिकाही घेतली जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. आवश्यक ती कागदपत्रे किंवा कायदेशीर प्रकरण असल्यास कोणतीही अडचण न येता परवाने मिळायला हवेत. त्याचप्रमाणे वेगवेगळय़ा परवान्यांसाठी वेगवेगळय़ा ठिकाणी जाण्यामुळे होणारी अडचण लक्षात घेता, अशा कालावधीत हे परवाने विनासायास एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, अशी मागणीही आयोजकांकडून करण्यात येत आहे.