हमाल पंचायतच्या अध्यक्षपदी डॉ. बाबा आढाव यांची फेरनिवड

पुणे :  देशातील शेतकरी, इतर कष्टकरी समाज आणि महिला वर्गासाठी काम करणाऱ्या हमाल पंचायत पुणे या कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांची फेरनिवड करण्यात आली आहे. वयाच्या ९२ व्या वर्षीही कष्टकऱ्यांसाठी लढण्याचा डॉ. बाबा आढाव यांचा उत्साह कायम असून कष्टकरी समाज आणि महिला वर्गाला योग्य ते मार्गदर्शन करून दिशा देण्याचे काम यापुढील काळातही संघटनेकडून केले जाईल, असे त्यांनी निवडीनंतर सांगितले.

central government taken away right to strike from workers alleged labour leaders
पिंपरी : केंद्र सरकारकडून कामगारांच्या संप करण्याच्या अधिकारावर गदा; कामगार नेत्यांचा आरोप
To end the politics of revenge and terror in the country make Shashikant Shinde win says Sharad Pawar
देशातील सुडाचे राजकारण व दहशत संपवण्यासाठी सर्वसामान्य शशिकांत शिंदे यांना विजयी करा- शरद पवार
NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार

गेली ६० वर्षे ते या संघटनेच्या अध्यक्षपदी काम करत आहेत. डॉ. बाबा आढाव यांची असंघटित कष्टकऱ्यांचे नेते, तसेच सत्यशोधक चळवळीचे खंदे समर्थक अशी ओळख आहे. कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी विविध आंदोलने आणि मोर्चामध्ये ते सहभाग घेत आहेत.  ‘एक गाव एक पाणवठा’ या चळवळीपासून त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. पुढे त्यांनी हमाल पंचायतची स्थापना केली. ‘कष्टाची भाकर’ हा त्यांनी सुरू केलेला उपक्रमही लक्षणीय ठरला आहे. बाबा आढाव हा एक विचार आहे. हमाल पंचायतचे कार्यकर्तेही संघटनेचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करत आहेत. बाबांचा आदर्शवाद, विचार, मूल्ये, तत्त्वांना संघटनेचे कार्यकर्ते सोडू शकत नाहीत, हे बाबांच्या निवडीचे निदर्शक आहे. बाबांनी सांगितलेली मूल्ये किती खोलवर रुजली आहेत, हेच या निमित्ताने दिसून येते, असे ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी सांगितले. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे म्हणाल्या,की बाबा आढाव यांचे नेतृत्व हे चळवळीच्या भविष्यासाठी नेहमीच स्वागतार्ह आहे. मात्र, ज्या कारणांसाठी या वयात, तब्येतीच्या तक्रारी असतानाही त्यांना हे नेतृत्व करावे लागते, ते अत्यंत खेदजनक आहे.

प्रा. सुभाष वारे म्हणाले,की बाबांबरोबर प्रत्येक संघटनेत कष्टकरी वर्गातून आलेले तरुण सहकारी आहेत. बाबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली या कार्यकर्त्यांची दुसरी फळी सर्वच कष्टकरी संघटनांचे प्रभावी नेतृत्व करते. त्यामुळे बाबांना दैनंदिन कामकाजामध्ये लक्ष घालण्याची गरज भासत नाही. मात्र, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकार दरबारी जी लढाई लढावी लागते ती इंच इंच लढवू अशा प्रकारातील असते. सरकारी स्तरावर चांगला प्रतिसाद अपेक्षित असेल तर बाबांसारख्या नेतृत्वाची गरज आहे.

कामगारांना निवृत्तीवेतन मिळावे..

आयुष्यभर  मेहनत करून वृद्ध झालेल्या कष्टकऱ्यांना निवृत्तीवेतन मिळावे ही मागणी सरकार पूर्ण करत नाही. केंद्र राज्याकडे बोट दाखवित आहे आणि राज्य केंद्र सरकारकडे पाहात आहे. आश्वासने द्यायची, घोषणा करायच्या, प्रत्यक्षात काहीच करायचे नाही हेच कष्टकऱ्यांच्या आयुष्यातील वास्तव आहे, अशी प्रतिक्रिया निवडीनंतर डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.