पुणे : महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात नव्याने जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाई जोरावर असली तरी दुरुस्तीकडे संबंधित ठेकेदार कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चुकीच्या पद्धतीने रस्ते दुरुस्ती होत असल्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून ठेकेदार कंपनीला स्पष्ट इशारा देण्यात आला असून दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

शहराला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कामे सुरू करण्यात आली असून आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर काही प्रभागात राबविण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आग्रही आहेत. त्यामुळे योजनेअंतर्गत कामे वेगाने करण्याची सूचना ठेकेदार कंपनीला करण्यात आली आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षांत  पाचशे किलोमीटर लांबीची रस्ते खोदाई करण्यात आली असून नव्याने जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीला हे काम देण्यात आले आहे. कळस, धानोरी, सहकारनगर, सदाशिव पेठ, बाजीराव रस्ता, कात्रज, कोंढवा, जांभुळवाडी, बिबवेवाडी, औंध, बालेवाडी, पाषाण, धायरी परिसरात सध्या नव्याने जलवाहिन्या टाकण्याबरोबरच जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या भागात रस्ते खोदाई केल्यानंतर रस्ते शास्त्रीय पद्धतीने पूर्ववत किंवा त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहे. मात्र रस्ते दुरुस्ती योग्य प्रकारे करण्याबाबत टाळाटाळ होत आहे. सहकारनगर, बिबवेवाडी, धायरी, पाषाण आदी भागांतून महापालिकेकडे त्यासंदर्भात तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय स्तरावरही शेकडो नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. पथ विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनाही या तक्रारीत तथ्य आढळले आहे. अभियंत्यांकडूनही मुख्य खात्याला त्याबाबत कळविण्यात आले आहे.

दरम्यान, सहकारनगर भागातील नागरिकांच्या तक्रारीनंतर ठेकेदार कंपनीला रस्ते दुरुस्तीच्या कामाचा दर्जा सुधारण्याबाबतची सूचना करण्यात आली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी शास्त्रीय पद्धतीचा  अवलंब करावा अन्यथा चुकीच्या पद्धतीने काम केल्याबद्दल दंड आकारला जाईल, असे सांगण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी दिली. ‘जलवाहिन्या टाकण्यासाठी कामे करण्यात आल्यानंतर काँक्रिटीकरण करण्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून रस्ते दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवण्यास सुरुवात झाली आहे,’ असे योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकुमार जगताप यांनी सांगितले.

१६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने

समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांना दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला. मात्र योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याने कंपनीला यापूर्वी प्रती दिन एक लाख रुपयांचा दंड महापालिका प्रशासनाकडून ठोठाविण्यात आला होता. तसे पत्रही पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले होते. त्यानंतर कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. आत्तापर्यंत ५०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. योजनेअंतर्गत १ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी रस्ते खोदाई करण्यात येणार आहे.