सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांमुळे कुणाला कसा काय फटका बसेल सांगता येत नाही. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला. जगभरात आरोग्य आणिबाणी लागली. कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी संशोधन सुरू आहे. तर दुसरीकडं व्हॉटस् अ‍ॅपवर सल्ले आणि अफवांचं पिक आलं आहे. अशाच एका अफवेमुळे कुक्कूटपालन क्षेत्राला दररोज १० कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

“चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो अशी अफवा फेसबुक, व्हाट्सऍप आणि इतर माध्यमातून पसरवली जात आहे. त्यावर कोणी विश्वास ठेवू नये असे पशु संवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी आवाहन केले आहे. ते औंधमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. “चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरल्याने चिकनचा खप घसरला आणि दररोज तब्बल दहा कोटी रुपयांचा फटका या क्षेत्राला बसत आहेत,” असं प्रसन्न पेडगावकर यांनी सांगितलं.

“काही दिवसांपूर्वी व्हाट्सऍपवर चिकन आणि कोरोना व्हायरसचा संबंध जोडून विनाकारण अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे नॉनव्हेज खाणाऱ्या अनेक नागरिकांनी मांसाहार बंद केला. याचा परिणाम थेट कुकुटपालन आणि चिकन विक्रीवर झाला. चिकन विक्री ३० ते ३५ टक्क्यांनी घटली होती. त्यामुळे दररोज तब्बल १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वेंकीजचे प्रसन्न पेडगावकर म्हणाले, “महाराष्ट्रात कुक्कूटपालन हा व्यवसाय केला जातो. ४ फेब्रुवारीला सोशल मीडियावर (व्हाट्सऍप) अफवा पसरली. त्यात पोल्ट्रीचे काही फोटो दाखवण्यात आले. त्यात चिकन आणि कोरोना व्हायरसचा काही कारण नसताना संबंध जोडण्यात आला. त्यानंतर ग्राहकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे चिकनच्या खपावर ३० ते ३५ टक्के परिणाम झाला. दररोज तीन हजार ते साडेतीन हजार मेट्रिक टन चिकन विकल जायचं तो खप खाली आला. तो थेट दोन हजार मेट्रिक टनांपर्यंत आला. त्यानंतर सरकारने एक नोटीस काढली. त्यामध्ये चिकन हे सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर खपामध्ये सुधारणा झाली आहे. दररोज १० ते ११ करोड रुपयांचे नुकसान होत होते. ४ फेब्रुवारीपासून ते १९ फेब्रुवारीपर्यंत दीडशे करोड रुपयांच नुकसान कुकुटपालन व्यवसायाचे झाले,” असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, सोशल मीडियावर कोरोना व्हायरस आणि चिकन यांच्या संबंधीची अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर क्राईममध्ये अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार देण्यात आली. त्यानुसार ते तपास करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.