मुकुंद टाकसाळे (प्रसिद्ध विनोदी लेखक)

पुस्तके वाचताना किंवा विकत घेताना मी कधीही भेदभाव केला नाही. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, विनोदी, ललित, संतसाहित्य, कवितासंग्रह यांसह विविध प्रकारची पुस्तके मी माझ्या बुकशेल्फमध्ये संग्रहित करीत गेलो. माहिती आणि ज्ञान मिळविण्याचा एक भाग म्हणून सध्या पुस्तकांकडे पाहिले जाते. मात्र, तेवढय़ापुरते वाचन मर्यादित न ठेवता, जगायचे कसे आणि कशासाठी ही शिकवण आत्मसात करण्याचा प्रयत्न मी वाचनातून केला. साहित्याच्या कोणत्या प्रकारातून अथवा कोणत्या भाषेद्वारे आपण समग्रतेचे भान संपादन करतो, हे महत्त्वाचे नसते. तर, बहुरंगी आणि बहुढंगी वैभवसंपन्न अशा दागिन्यांसारख्या पुस्तकांतूनच आपल्याला जगण्याची दिशा मिळते.

duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!

माझ्या लेखनासंदर्भात पहिल्यांदा मी पु. ल. देशपांडे यांच्याशी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून भेटत होतो. पुरंदर तालुक्यातील शेवटचे निरा हे माझे गाव. आमचं शेतकरी कुटुंब असल्याने आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे घरामध्ये पुस्तके नव्हतीच. कोणाकडे सहज बाबुराव अर्नाळकरांची पुस्तके वाचायला मिळत. त्या वेळी गावामध्ये तसे मनोरंजनाचे साधन नव्हते. पुस्तके हेच काय ते वेगळे माध्यम असे. जीवन शिक्षण विद्यामंदिर आणि रयत शिक्षण हायस्कूलमध्ये माझे शिक्षण झाले. घरी वडील (मोरेश्वर) पुलंचे ‘बटाटय़ाची चाळ’ हे पुस्तक वाचून दाखवीत. परवडत नसतानाही ते मला पुलंचे बहुपात्रिक प्रयोग बघायला पुण्याला पाठवीत. त्यामुळे पुलंच्या साहित्याचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव पडला. प्रवीण कोठडिया आणि राम शितोळे हे माझे मित्र. त्या वेळी आम्ही जयवंत दळवी, पुलंचे साहित्य झपाटून वाचत असू.

पुढील शिक्षणासाठी बारामतीला गेल्यानंतर ललित साहित्य, नियतकालिकांच्या माध्यमातून वाचनाला पोषक वातावरण निर्माण झाले. ‘तुज आहे तुज पाशी’, ‘बटाटय़ाची चाळ’ ही पुस्तके आमची तोंडपाठ होती. बारामतीतील मोरोपंत वाचनालय, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे ग्रंथालय या दोन वास्तूंनी माझ्या वाचनप्रवासात मोलाची भर पाडली. ‘लोक लाखो रुपयांचे घरे बांधतात, पण पुस्तके ठेवण्यासाठी कोपराही ठेवत नाहीत,’ हे पुलंचे वाक्य आजही माझ्या लक्षात आहे. त्यामुळे ग्रंथालयाची वास्तू किंवा घरामध्ये सहज उपलब्ध होतील, अशा प्रकारे पुस्तकांची जागा व मांडणी असावी, असे मला वाटते. त्याप्रमाणे माझ्या घरी पुस्तकांची कपाटे वेगळ्या पद्धतीने तयार करून घेतली असून प्रत्येक खोलीमध्ये बुकशेल्फसाठी स्वतंत्र जागा राखून ठेवली आहे.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये नोकरी करीत असताना गांधींचे ‘सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक विकत घेतले. १९७४-७५ पासून पुस्तके खरेदी करून वाचनाची लागलेली सवय आजही कायम आहे. दर महिन्याला माझ्या पगारातून दोनशे ते तीनशे रुपये बाजूला काढून पुस्तके विकत घ्यायची, असा रिवाज होता. त्या वेळी केशवराव कोठावळे यांनी नारायण पेठेमध्ये मॅजेस्टिक गप्पा हा उपक्रम सुरू केला होता. तेथील प्रदर्शनात सर्व प्रकाशकांची पुस्तके पुस्तके हाताळणे आणि तेथेच बसून वाचणे, हा छंद मला लागला. त्यामध्ये तेंडुलकर यांची नाटके, अरुण साधू,  पु. ल. देशपांडे यांचे साहित्य व विविध कवितासंग्रह मी घेत गेलो. ‘घाशीराम कोतवाल’ नाटक रंगभूमीवर आल्यानंतर त्या काळचे सांस्कृतिक वातावरण चतन्यमय झाले होते. त्याचवेळी दलित पँथरची चळवळ, युक्रांदची चळवळ यांमुळे दलित साहित्य मोठय़ा प्रमाणात आले. या सोबतच डॉ. अनिल अवचट यांचे ‘साधना’तील लेखन मला त्या वेळी भावले. मुंबईला गेल्यावर जयवंत दळवी यांना आवर्जून भेटत असे. त्या वेळी ते त्यांनी स्वाक्षरी केलेली पुस्तके मला भेट देत. डॉ. अभय बंग, गोदावरी परुळेकर, यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य माझ्या संग्रहात वाढत गेले. ‘प्रत्येकाकडे किमान शंभर पुस्तके हवीत’ असा शंकर सारडा यांचा लेख वाचून मी ७५ पुस्तके मी विकत घेऊन वाचली. तुकाराम गाथा, नामदेव गाथा, ज्ञानेश्वरी, तुकाराम दर्शन, पुन्हा तुकाराम अशी संतवाङ्मयातील डॉ. सदानंद मोरे, दिलीप चित्रे यांची पुस्तके माझ्याकडे आहेत. होनाजी बाळा, अंधारातल्या लावण्या, समग्र फुले, दलित आत्मचरित्र यांसह दुर्गा भागवत यांचे ‘वॉल्डन काठी विचार विहार’, दि. बा. मोकाशी यांचे ‘घणघणतो घंटानाद’ ही पुस्तके मला भावली.

विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, केशवसुत, नारायण सुर्वे, कल्पना दुधाळ, अरुण कोल्हटकर यांचे कवितासंग्रह माझ्या बुकशेल्फमध्ये आहेत. आसाराम लोमटे, जयंत पवार असे लेखक मित्रवर्य माझ्या घरी गप्पांच्या मैफिलीसाठी येत असल्याने पुस्तकांप्रमाणेच त्यांचे विचार जाणून घेण्याची संधी लाभली. कुसुमाग्रज, शकुंतला परांजपे, शांता शेळके, मेघना पेठे यांनी भेट म्हणून दिलेली पुस्तके मी आजही जपून ठेवली आहेत. िहदी साहित्यामध्ये हरिशंकर परसाई, शरद जोशी, प्रेमचंद, महाश्वेतादेवी यांची पुस्तके वाचताना मी हरवून जातो. सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यांची नाटके भावली. त्यामुळे ‘सौभद्र’पासून ते ‘मराठी रंगभूमीच्या तीन रात्री’ अशी पुस्तके माझ्याकडे आहेत. ‘मधुकर’ हे विनोबा भावे यांचे पुस्तक वाचून भारावलो आणि वध्र्याला जाऊन त्यांचे सर्व साहित्य मी घेतले. जी. ए. कुलकर्णी, श्याम मनोहर, विलास सारंग यांनी माझे वाचनाचे वेड पाहून मला पुस्तके भेट दिली आहेत. वाचनाप्रमाणे माझ्या लेखनप्रवासात अनेकांकडून मला प्रोत्साहन मिळाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्या काळी तरुणाईमध्ये मनोहर साप्ताहिक प्रसिद्ध होते. त्यांच्या दिवाळी अंकातर्फे दरवर्षी विनोदी लेखन स्पर्धेत सलग चार वर्षे मला पारितोषिक मिळाले. किर्लोस्कर मासिकाच्या स्पर्धेतही पारितोषिक मिळाले. ‘पु. ल. बटाटा अर्पाटमेंट’ ही किलरेस्करमध्ये लिहिलेली कथा गाजली. ती लेखनाची

दमदार सुरुवात अजूनही कागदावर उतरत आहे. त्यामुळे पुस्तकांचा संग्रह हा प्रत्येकाच्या घरामध्ये असावा, असेच मला वाटते. पुस्तकांचा उपयोग योग्य वेळी झाला, तरच पुस्तके आपल्याला जीवन जगण्याचे भान देत, माणसांची खरी ओळख पटवून देतात.

शब्दांकन : वीरेंद्र विसाळ