पं. नेहरू स्टेडियम येथील क्रिकेटच्या मैदानासह तेथील अन्य जागा व शहरातील इतर मैदानांचा वापर करण्यासाठीचे भाडेदर मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात आले असून ही दरवाढ दोन ते पाच पट एवढी आहे.
मैदानांच्या वापरासाठीचे दर वाढवण्यासंबंधीचा हा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. मूळ प्रस्तावानुसार बहुतेक सर्व दर दहा पटींनी वाढवले जाणार होते. मात्र, स्थायी समितीने ते दोन ते पाच पटींपर्यंत कमी केले. पं. नेहरू स्टेडियमवरील व्यावसायिक क्रिकेट सामन्यासाठी सध्या प्रतिदिन एक हजार रुपये आकारले जातात. हे शुल्क १० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव होता. त्या ऐवजी आता ते प्रतिदिन पाच हजार रुपये करण्यात आले आहे. अव्यावसायिक सामन्यांसाठी हा दर प्रतिदिन दोन हजार रुपये असेल. तो सध्या एक हजार रुपये आहे.
क्रिकेट सरावासाठी सकाळी किंवा दुपारी एक खेळपट्टी (व्यावसायिक सराव) एक महिना वापरायची झाल्यास सध्या दरमहा एक हजार रुपये आकारले जातात. हे शुल्क पाच हजार करण्यात आले आहे. तसेच अव्यावसायिक सरावासाठी ते दोन हजार रुपये असेल. क्रिकेट प्रशिक्षण वर्ग चालवण्यासाठीचे शुल्कही दोन हजार रुपयांवरून १० हजार रुपये करण्यात आले आहे. प्रशासनाने ते २० हजार रुपये करावे असा प्रस्ताव दिला होता. याच पद्धतीने दि क्लब ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कातही २५० रुपयांवरून पाच हजार रुपये (क्रिकेट सामना) आणि ५०० रुपयांवरून पाच हजार रुपये (क्रिकेट वर्ग, एक महिना) अशी वाढ करण्यात आली आहे.
नेहरू स्टेडियम येथील टेबल टेनिस हॉल, तसेच कॅरम, बुद्धिबळ, चित्रकला स्पर्धा, बक्षीस समारंभ व अन्य कार्यक्रमांसाठीचे  सभागृह शुल्क यापुढे प्रतितास १०० ऐवजी १५० रुपये असेल. नेहरू स्टेडियम येथे १०८ ते ८८० चौरसफुटांचे ३२ गाळे असून त्यांच्या भाडय़ातही चार ते पाच पटींनी वाढ करण्यात आली आहे.
भवानी पेठेतील अरुणकुमार वैद्य स्टेडियमचे भाडे प्रतिदिन २०० वरून एक हजार रुपये करण्यात आले असून हडपसर येथील हॅन्डबॉल अकादमीचे भाडे यापुढे प्रतिदिन दोन हजार रुपये आकारण्यात येणार आहे.