क्रोकोडाइल सफर.. विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स.. जांभूळ, करवंद, तोरणं, बोरं, बकुळ असा खास कोकणचा रानमेवा.. फणस आणि काजू.. हापूसचा आंबा.. सी फूड.. अशा नावीन्यपूर्ण वैशिष्टय़ांसह चिपळूण येथे ७ ते ९ मे या कालावधीत रत्नागिरी महोत्सव रंगणार आहे. हा महोत्सव पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू असून १५ हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे चिपळूण येथील पवन तलाव मैदानावर ७ ते ९ मे या कालावधीत रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्लोबल चिपळूण टुरिझम हे या महोत्सवाचे सहआयोजक असून रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते ७ मे रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. खासदार विनायक राऊत, हुसेन दलवाई आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम गोलांडे या वेळी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवासाठी चिपळूण नगरी सजविण्यात येत असून राज्यभरातून अधिकाधिक पर्यटक यावेत, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी तहसीलदार अमोल कदम यांनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात दिली. या महोत्सवाच्या वातावरण निर्मितीसाठी ६ मे रोजी चिपळूण शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ग्लोबल चिपळूण टुरिझमचे रामा रेडीज आणि संजीव अणेराव यांनी दिली.
रांगोळी स्पर्धा, सुरक्षित सागरी पर्यटन विषयावर व्याख्यान, पर्यटनाचे बदलते स्वरूप आणि संधी या विषयावर केसरी पाटील यांचे व्याख्यान, ‘चला हवा येऊ द्या’च्या कलाकारांचा कॉमेडी कल्ला, एरो मॉडेिलग, कराटे प्रात्यक्षिके, पाककला स्पर्धा, ‘महाराष्ट्र महोत्सव’ हा स्थानिक लोककलांवर आधारित कार्यक्रम, डॉग शो, पुष्परचना स्पर्धा, कृषी पर्यटनावर व्याख्यान आणि प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे शिवचरित्रावर व्याख्यान, सुदेश भोसले यांची संगीत रजनी असे तीन दिवस भरगच्च कार्यक्रम या महोत्सवामध्ये होणार आहेत. महोत्सवादरम्यान प्राचीन कोकणावर आधारित थ्री-डी शो, लाइव्ह स्केच, हवाई छायाचित्रणाचे प्रदर्शन, गोवळकोटच्या नदीपात्रातील डोहात वॉटर स्पोर्ट्स, स्कूबा डायव्िंहग, बनाना राइड यासह कृषी प्रदर्शन, बचत गटाचे स्टॉल, कोकणातील रानमेवा, हापूस आंबा आणि सी फूडचे स्टॉल्सही असतील. या महोत्सवासाठी चिपळूण शहराने कात टाकली आहे. बाजारपेठेतील मुख्य भिंती स्वच्छ करून रंगरंगोटी करून त्यावर निसर्गाची चित्रे रेखाटण्यात येणार आहेत. शहरातील चौकाचौकांचे सुशोभीकरण करण्याचे काम गतीने सुरू आहे.

Story img Loader