पुण्यातील एका कंपनीत लागलेली आग विझविताना अग्निशामक दलाचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शिवदास खुटवड असे जखमी जवानाचे नाव असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज येथील टेल्को कॉलनीजवळील आर.एस. इंडस्ट्रियल या पावडर कोटिंग निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती. कंपनी बंद असल्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाला अडचण येत होती. आत जाऊन आग विझविण्यासाठी शिवदास खुटवड हे दरवाजाचे कुलूप तोडत असतानाच आतील सिलिंडरचा स्फोट झाला आणि दरवाजाचा पत्रा खुटवड यांच्या छातीला लागला. यात खुटवड हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ भारती रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
आगीमुळे येथील ५ सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. आग तासाभरात आटोक्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.