व्हर्च्युअल विद्यापीठ किंवा मेटा विद्यापीठ आता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येणार असून महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमकेसीएल) ‘परम इंटरव्हर्सिटी’ सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हर्च्युअल वर्ग ‘परम इंटरव्हर्सिटी’मध्ये असणार आहेत. सोमवारी (१८ नोव्हेंबर) या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. राम ताकवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या वेळी एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत, मॅनेजर उदय पंचपोर आदी उपस्थित होते. एमकेसीएलतफे ‘परम इंटरव्हर्सिटी’ ची योजना आखण्यात आली असून १८ नोव्हेंबरला त्याचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर तीन ते सहा महिन्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होईल. परम इंटरव्हर्सिटीमध्ये स्वाध्याय, स्वयंअध्ययन यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध होणार आहे. या दोन्ही पद्धतींमध्ये मूल्यमापन चाचण्या, स्वाध्याय, स्वमूल्यांकन चाचण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व विद्यापीठांशी संपर्क साधून त्यांचे अभ्यासक्रमही परम इंटरव्हर्सिटीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये शिक्षक, मार्गदर्शकांची व्याख्याने, चाचण्या यांचा समावेश असणार आहे. मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्षात उपयोग करण्याचा दृष्टिकोन ठेवून या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प हे मेटा युनिव्हर्सिटीच्या निर्मितीमधील पहिले पाऊल आहे, असे डॉ. ताकवले यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त १८ नोव्हेंबरला चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या चर्चासत्रामध्ये अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, कॉमनवेल्थ ऑफ लर्निग या संस्थेच्या अध्यक्ष आशा कन्वर आदी आपले विचार व्यक्त करणार आहेत.