तरुण वर्गाच्या प्रतिसादामुळेच मराठी चित्रपट सृष्टी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चित्रपट सृष्टीच्या व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी पुण्यातील काही उत्साही तरुण व्यावसायिकांनी एकत्र येऊन मराठी युथ आंत्रप्रिन्युअर क्लबची नुकतीच स्थापना केली आहे. या क्लबची गुरूवारी एक बैठक झाली.
या बैठकीला प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, राजेश दामले, मिलिंद लेले, कांचन नाईक आदी उपस्थित होते. या वेळी क्लब सदस्यांनी उपस्थित असलेल्या मान्यवरांना विविध प्रश्न विचारले. या बैठकीस उपस्थित असलेल्यांनी कथा, पटकथा, दिग्दर्शन, जाहिरात वितरण हे चित्रपट निर्माण करताना अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे सांगितले. या वेळी विक्रम गोखले यांनी सांगितले की, मराठी चित्रपटाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत गांभीर्याने आणि व्यवस्थित नियोजनपूर्वक बघितले पाहिजे.