लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर झाली असताना महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटात बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवारपासून प्रारंभ झाला. १८ ते २५ एप्रिल या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. पहिल्यादिवशी एकूण २७ जणांनी ४७ उमेदवारी अर्ज घेतले. तर, एकानेही अर्ज दाखल केला नाही. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वाघेरे हे २३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. असे असताना त्यांचे जवळचे नातलग, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे यांनी अपक्ष व ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…

दत्तात्रय वाघेरे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. २०१७ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून महापालिकेची निवडणूक लढविली. मात्र पराभूत झाले. शिवसेना फुटल्यानंतर ते ठाकरे गटात राहिले. लोकसभा निवडणूक लढविण्यास ते इच्छुक होते. परंतु, उमेदवारीची जाहीरपणे मागणी केली नव्हती. संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर करताना विश्वासात घेतले नसल्याने दत्तात्रय वाघेरे नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच वाघेरे यांनी अर्ज घेत बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे संजोग यांच्या अडचणीत भर पडली आहे.

दरम्यान, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान, वाघेरे यांच्यासह बहुजन समाज पक्षाकडून रफिक कुरेशी यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे.