जुना मुंबई-पुणे महामार्गावर सोमवारी पहाटेच्या सुमारास कार आणि कंटेनरचा अपघात झाला. कारमधील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना देहूरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी कार भरधाव वेगात होती. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारने कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. यात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे स्विफ्ट कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अपघातानंतर कंटेनर चालक हा न थांबताच निघून गेला. कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. या अपघातातील जखमी पिंपरी- चिंचवडमधील निगडी परिसरातील रहिवाशी आहेत. पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.