सराफांकडून सोने घेऊन दागिने घडविणाऱ्या कारागिराने पुण्यातील दहा ते बारा सराफांना गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. हा कारागीर तब्बल दोन किलो सोने घेऊन पसार झाला असून, याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोफीजल शेख (वय २३, रा. रविवार पेठ, गोिवद हलवाई चौक, काकडे गोल्ड प्लाझा. मूळ रा. पश्चिम बंगाल) असे कारागिराचे नाव आहे. त्याच्यासह इतर तीन साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिगंबर दादासाहेब बाबर (वय ३०, रा. वारजे माळवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मागील दहा ते बारा वर्षांपासून पुण्यात रहात होता. सराफांकडून सोने घेऊन त्यांच्या मागणीनुसार दागिने तयार करून देण्याचे काम तो करीत होता. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करीत असल्याने सराफांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. फिर्यादी बाबर यांनी शेखकडे काही दागिने बनविण्यासाठी सोने दिले होते. मात्र, बराच दिवस उटलूनही दागिने न मिळाल्याने त्यांनी शेखला फोन केला, मात्र तो बंद होता. त्यांनी इतर सराफांकडेही त्याची चौकशी केली व शेवटी त्याची खोली गाठली. पण, तो व त्याचे साथीदार पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

शेख याने इतर अनेक सराफांकडून सोने घेतलेले आहे. सुमारे दोन किलो सोने घेऊन तो पसार झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.