शहरातील ऐतिहासिक स्थळांच्या इतिहासाची माहिती देशभरासह जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशातून महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या ‘हेरिटेज वॉक’ला आता नवी झळाळी मिळणार आहे. ऐतिहासिक ठिकाणांची माहिती देण्यासाठी प्रशिक्षित गाईड्सची नियुक्ती करण्याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्नही या नव्या आरखडय़ामध्ये केला जाणार आहे.
‘हेरिटेज वॉक’ संकल्पना यशस्वी करण्यासाठी येत्या पंधरवडय़ात आराखडय़ाला अंतिम स्वरूप देण्यात येणार असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ‘हेरिटेज वॉक’मध्ये शालेय विद्यार्थी सहभागी होत नाहीत ही त्रुटी लवकरच दूर केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांबरोबरच खासगी शाळांशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पुरातत्त्व विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम ढवळे यांनी दिली.
पुण्यात शनिवारवाडय़ासह अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. या ठिकाणांना भेटी देण्यासाठी देशभरासह जगभरातून पर्यटक मोठय़ा प्रमाणावर येतात. मात्र, ही ठिकाणे पाहण्यासाठी यापूर्वी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कोणतीही सुविधा निर्माण करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे पर्यटकांना सर्व ठिकाणांना भेटी देणे शक्य नव्हते. ही बाब ध्यानात घेऊन महापालिकेने ‘जनवाणी’ संस्थेच्या सहकार्याने हेरिटेज वॉक ही संकल्पना सुरू केली आहे. त्यासाठी विद्यार्थी, देशभरातील पर्यटक आणि परदेशातील पर्यटक अशा तीन वर्गवारीमध्ये वेगवेगळे दर आकारले जातात. या योजनेद्वारे पर्यटकांना महत्त्वाच्या ठिकाणांसह १८ ऐतिहासिक ठिकाणे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, वॉक संपताना सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी दिली जाते. ही योजना आणखी प्रभावी करून अधिकाधिक पर्यटक आकर्षित व्हावेत यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. हेरिटेज वॉकला नवी झळाळी देण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात येत असून येत्या पंधरवडय़ात त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. ऐतिहासिक ठिकाणांची पर्यटकांना व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी प्रशिक्षित गाईड्सची नेमणूक केली जाणार असल्याचेही श्याम ढवळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heritage walk guide historical places
First published on: 01-11-2014 at 03:20 IST