रामदास आठवले त्यांच्या कवितांसाठी आणि त्यांच्या टोल्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी विरोधकांवर केलेली टीकाही प्रसंगी त्याच विरोधकांची दादही मिळवून जाते. आज पुन्हा एकदा रामदास आठवलेंनी खास त्यांच्या शैलीत टोलेबाजी केली आहे. पुण्यात महायुतीच्या सभेसाठी रामदास आठवलेही व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ केलेल्या भाषणातून शरद पवार व सुप्रिया सुळेंवर खोचक शब्दांत टीका केली. तसेच, खास त्यांच्या शैलीतल्या कविता त्यांनी ऐकवताच उपस्थितांममध्ये चांगलाच हशा पिकला!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार महायुतीत आले कारण सुप्रिया सुळे…

बारामतीमधून महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवातच कवितांनी केली. “एवढंच सांगतो की ‘अजित पवार महायुतीसोबत आले ज्या कारणामुळे, ते कारण आहेत सुप्रिया सुळे, अजित पवार आता राहिले नाहीत खुळे, त्यामुळेच हरणार आहेत सुप्रिया सुळे… कुणी कितीही केला कल्ला, तरी सुनेत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला.. अजित पवारांनी गाठलाय विकासाचा पल्ला.. म्हणूनच मी शरद पवारांना देतो मोदींसोबत येण्याचा सल्ला”, असं त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

रामदास आठवलेंनी केलेल्या कवितेमुळे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्येही हास्याची लकेर उमटली. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेताच व्यासपीठावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही हसत डोक्याला हात मारला.

सुनेत्रा पवार बाहेरची सून? विरोधकांच्या टीकेवर आठवले म्हणतात…

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्यावर ‘बाहेरची सून’ म्हणून टीका करणाऱ्या विरोधकांना रामदास आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून खोचक उत्तर दिलं. “सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ही बाहेरची आहे सून, सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून आणि अजित पवार फेडतील बारामतीकरांचे ऋण”, असं रामदास आठवले म्हणाले.

“आता सुनेत्रा पवारांना भाषणं करू द्या”

“सुप्रिया सुळेंबद्दल मला आनंद आहे. त्यांनी लोकसभेत चांगली भाषणं केली आहेत. आता सुनेत्रा पवारांना चांगली भाषणं करू द्या. त्यांना संसदेत जाऊ द्या. अजित पवारांनी सर्वात आधी निर्णय घेतला की सुनेत्रा पवारांना उभं करायचं. तेव्हा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना उभं करायला नको होतं. ही सून बाहेरची कशी झाली? सुप्रिया सुळेच बाहेरच्या आहेत. त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या सुळे कुटुंबात गेल्या आहेत. सुनेत्रा पवार या पवार कुटुंबात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरचं म्हणणं योग्य नाही. त्या आपल्या सून आहेत”, असं रामदास आठवले म्हणाले.

“…तर अजित पवार मलाच मतदान करतील”, सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या, “माझा मराठीतला कार्यअहवाल…!”

“जेव्हा सोनिया गांधी बाहेरच्या होत्या, तेव्हा शरद पवारांनी त्या बाहेरच्या आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप केले होते. शरद पवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं. ज्या काँग्रेसनं त्यांच्यावर अन्याय केला, त्या काँग्रेससोबत जायची गरज नव्हती. पण त्यांनी निर्णय घेतला नाही. शरद पवार इकडे आले असते तर अजित पवार इकडे आलेच असते. पक्षात फूट पडलीच नसती. शेवटी अजित पवारांना निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांचं घड्याळ गेलं”, अशा शब्दांत रामदास आठवलेंनी शरद पवारांना लक्ष्य केलं.

“गावागावातली म्हणत आहेत म्हातारी, शरद पवार का घड्याळ सोडून वाजवत आहेत तुतारी?” अशी चारोळीही रामदास आठवलेंनी यावेळी केली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale mocks supriya sule sharad pawar in pune rally pmw
First published on: 18-04-2024 at 12:17 IST