मिळकत करासह पाणीपट्टी, सफाई, जलनिस्सारण, पथ, शिक्षण आदी सर्व करांमध्ये मिळून आगामी आर्थिक वर्षांत १८ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. या करवाढीमुळे महापालिकेला २६६ कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळेल, असा अंदाज असून आगामी आर्थिक वर्षांत पुणेकरांवर मिळकत करवाढीचा बोजा पडण्याची शक्यता या प्रस्तावामुळे  निर्माण झाली आहे.
महापालिका कायद्यानुसार पुढील आर्थिक वर्षांतील करांच्या दराला २० फेब्रुवारी पर्यंत मुख्य सभेने मान्यता घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आगामी आर्थिक वर्षांसाठी करवाढीचा प्रस्ताव तयार केला असून तो स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. या प्रस्तावावर आता विविध राजकीय पक्ष कोणती भूमिका घेतात या बाबत उत्सुकता आहे. चालू आर्थिक वर्षांतील उत्पन्न व खर्च यांचा अभ्यास करून पुढील आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक तयार केले जाते. ते करताना खर्च व उत्पन्न यांची सांगड घालणे आवश्यक आहे. चालू अंदाजपत्रकात आलेली ३०० कोटींची तूट विचारात घेता तसेच गेल्या दोन वर्षांत मिळकत करात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही ही परिस्थिती लक्षात घेता विविध करांच्या दरांमध्ये १८ टक्के इतकी वाढ सुचवण्यात आल्याचे करवाढीच्या प्रस्तावात म्हटले आहे.
सर्वसाधारण करातील वाढ
वार्षिक करपात्र रक्कम १ ते २,००० रुपये तसेच २००१ ते ५,००० रुपये, ५००१ ते २०,००० आणि २०,००० चे पुढे करपात्र रक्कम असणाऱ्या शहर व ग्रामीण भागातील मिळकतींना सध्या शेकडा १४.७५ ते ३८.७५ टक्के मिळकत कर द्यावा लागतो. त्यात सरासरी तीन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
सफाईपट्टीत पाच टक्के वाढ
करपात्र मूल्यावर सध्या शेकडा १७.५० टक्के सफाईपट्टी आकारली जाते. या दरात ५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
पाणीपट्टी दुप्पट करण्याचा प्रस्ताव
शहर आणि महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील निवासी मिळकतींना सध्या वार्षिक करपात्र रकमेनुसार ९००, १,००० आणि १,१०० रुपये अशी पाणीपट्टी आकारली जाते. त्यात दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. बिगर निवासी मिळकतींना सध्या ७५० रुपये पाणीपट्टी आकारली जाते. ती करपात्र रकमेनुसार २,००० ते २,४०० करण्याचा प्रस्ताव आहे. पूरग्रस्त वसाहतींना एकवट ३०० रुपये पाणीपट्टी आकारली जाते. ती ६०० रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. हद्दवाढीतील गावांमध्येही ज्या दराने पाणीपट्टी आकारली जाते त्या दरात १५० ते ३०० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.
वृक्ष कर, अग्निशामक कर
वार्षिक करपात्र मूल्यावर सध्या १ टक्का या दराने वृक्ष कर आकारला जातो. त्यात वाढीचा प्रस्ताव नाही. अग्निशामक कर वार्षिक करपात्र मूल्यावर शेकडा १.५० टक्के असा प्रचलित दर असून तो शेकडा २ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.
जललाभ करातही वाढ
जललाभ कर वार्षिक करपात्र मूल्यावर सध्या शेकडा ३.७५ टक्के इतका लावला जातो. तो ६ टक्के करण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे.
जलनिस्सारण, पथ कर
वार्षिक करपात्र मूल्यावर शेकडा ७.५० टक्के इतका जलनिस्सारण कर आकारला जातो. तो साडेचार टक्क्यांनी वाढवून १२ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. पथकर सध्या ९ टक्के इतका आकारला जात असून तो १० टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे.
शिक्षण उपकर
शिक्षण उपकर सध्या शेकडा १.७५ टक्के या दराने आकारला जातो. तो ४ टक्के करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
सवलत कायम राहणार
गांडूळखत, सौरउर्जा तसेच पर्जन्यजल संधारण या योजना राबवणाऱ्या मिळकतधारकांना देण्यात येणारी सूट यापुढेही कायम राहील.