आग्रा आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचे सौंदर्य उलगडणाऱ्या मैफली.. मंत्रमुग्ध करणारे बासरीवादन.. रसिकांना खिळवून ठेवणारा कथक नृत्याविष्कार.. गायन-वादन आणि नृत्य अशा संगीताच्या त्रिवेणी संगमाची अनुभूती ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त रसिकांनी शनिवारी घेतली. पं. उल्हास कशाळकर यांच्या रससिद्ध गायनाने महोत्सवातील तिसऱ्या सत्राची सांगता झाली. रसिकांच्या अलोट गर्दीमुळे दररोज केली जाणारी तिकिटविक्री बंद करण्याची वेळ संयोजकांवर आली.
आग्रा घराण्याच्या युवा गायिका भारती प्रताप यांच्या गायनाने शनिवारच्या सत्राचा प्रारंभ झाला. ‘भीमपलास’ रागानंतर त्यांनी ‘पूर्वी’ रागातील बंदिश  सादर करताना घराणेदार गायकीची प्रचिती दिली. ‘खमाज’ रागातील दादरा गायनाने त्यांनी समारोप केला. या महोत्सवातील त्यांची पदार्पणाची मैफल गाजली. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य रघुनंदन पणशीकर यांनी ‘भूप’ रागाचे सौंदर्य उलगडले. किशोरीताईंनी लोकप्रिय केलेली ‘सहेला रे’ ही रघुनंदन यांनी गायलेली बंदिश रसिकांची दाद घेऊन गेली. ‘पद्मनाभा नारायणा’ या अभंगाने त्यांनी मैफलीची सांगता केली. टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी पणशीकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पणशीकर यांच्या गायनमैफलीची सांगता होत असताना रसिकांच्या विक्रमी गर्दीने मंडप भरून गेला. त्यामुळे दैनंदिन तिकिटविक्री थांबविण्यात आली. प्रवीण गोडखिंडी यांच्या बासरीवादनाने महोत्सवात तिन्हीसांजेला रंग भरला. ‘मारुबिहाग’ रागाची वैशिष्टय़े त्यांनी गायकी अंगाच्या वादनातून उलगडली. त्यांना ओजस अडिया यांनी तबल्याची समर्पक साथसंगत केली. त्यानंतर गोडखिंडी यांनी तंतकारी अंगाच्या वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. राजेंद्र गंगाणी यांच्या कथक नृत्याविष्कारानंतर पं. उल्हास कशाळकर यांच्या अनुभवसंपन्न गायनाने शनिवारच्या सत्राची सांगता झाली.

परगावचे रसिक मुक्कामाला
मेहुणपुरा येथील कार्यालयात
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची महती ध्यानात घेऊन पुण्यामध्ये ज्यांचे नातेवाईक आहेत असे रसिक डिसेंबरमध्ये आवर्जून या महोत्सवाला हजेरी लावतात. ज्यांचे पुण्यामध्ये कोणीही नाही, असे रसिक रमणबाग प्रशालेजवळील भीवरा लॉज आणि मंदार लॉज या ठिकाणी उतरणे पसंत करतात. अशा परगावच्या रसिकांची मेहुणपुरा येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. या कार्यालयाचे मालक विलास पळशीकर हे तबलावादक आहेत. या कार्यालयामध्ये मुक्काम करणाऱ्या एका व्यक्तीला दिवसासाठी २०० रुपये एवढे माफक शुल्क आकारले जात आहे. यामध्ये नाश्ता, चहा आणि स्नानासाठी गरम पाणी अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५६ रसिकांनी त्याचा लाभ घेतला असून शनिवार-रविवारी होणारी गर्दी ध्यानात घेता हा आकडा शंभरच्या घरात जाईल. सुदैवाने सध्या कोणताही मुहूर्त नसल्याने कार्यालयदेखील मोकळे आहे. यंदा प्रायोगिक तत्त्वावर केलेला हा उपक्रम यापुढे दरवर्षी राबविण्याचा मानस असल्याचे विलास पळशीकर यांनी सांगितले.

महोत्सवात आज
सत्र पहिले (सकाळी ८ वाजता)
– शौनक अभिषेकी (गायन)
– ध्रुव घोष (सारंगी)
– मालिनी राजूरकर (गायन)
सत्र दुसरे (दुपारी ३ वाजता)
– पद्मा देशपांडे (गायन)
– भारती वैशंपायन (गायन)
– पं. उपेंद्र भट (गायन)
– शुभा मुद्गल (गायन)
– सुरेश वाडकर (गायन)
– मंजू मेहता आणि पाथरेसारथी (सतार आणि सरोद)
– डॉ. प्रभा अत्रे