लोणावळ्यात गाडीने कट मारला म्हणून पर्यटकाला मैत्रिणीसमोर बेदम मारहाण

भुशी डॅम परिसरात घडली घटना.

मोटारीने कट मारला म्हणून एका पर्यटकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना लोणावळा परिसरात घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. वेदांता चंदानी (२४) असे मारहाण झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. पर्यटक मुंबईचा आहे. ते त्यांच्या मैत्रिणीसह लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सव्वातीनच्या सुमारास फिर्यादी वेदांता हे त्यांच्या मैत्रिणीसह चारचाकी मोटारीतू भुशी धरण परिसरात गेले होते. पुढे अँबी व्हॅलीकडे जात असताना भरधाव वेगात असलेल्या वेदांता यांच्या गाडीने दुचाकीस्वाराला कट मारला, तो व्यक्ती देखील त्याच्या पत्नीसह पर्यटनासाठी आला होता.

परंतु, पुढे रस्ता नसल्याने वेदांता हे परत आले, त्यावेळी दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीने तेथील एका व्यक्तीच्या कुबड्या घेत फिर्यादीची  मोटार अडवली. वेदांता यांना बाहेर येण्यास सांगितले व त्याच कुबड्यांनी वेदांता यांना बेदम मारहाण केली. घटनेत पर्यटक वेदांताच्या अंगावर व्रण उठले, तसेच इतर दुसऱ्या व्यक्तीने शिवीगाळ केली असल्याचं पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हा सर्व प्रकार भुशी धरण परिसरातील रामनगर येथे भरदिवसा घडला आहे. दरम्यान, कुबड्या वाकड्या झाल्याने पर्यटकांकडून अज्ञात व्यक्तीने अडीच हजार रुपये घेतले असल्याचं चौकशीअंती स्पष्ट झालं आहे, असं वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवार यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले आहे. या घटने प्रकरणी मारहाण करणाऱ्या अज्ञाताचा शोध सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: In lonavala bhushi dam area two wheeler rider beat one tourist from mumbai kjp 91 dmp