पुणे : राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णांपैकी ११९ रुग्णांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झाल्यानंतरही ओमायक्रॉन संसर्गाचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण झालेल्या नागरिकांना करोना प्रतिबंधात्मक वर्तनाबाबत गाफील न राहण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.   

राज्यात सोमवापर्यंत १६७ रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या १६७ पैकी ११९ रुग्णांचे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. १८ वर्षांखालील लसीकरणाला पात्र नसलेली मुले आणि काही मोजके लस न घेतलेले नागरिक सोडल्यास लसीकरणानंतरही ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या  लक्षणीय आहे. देशात करोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी प्रयत्न केले. लस मिळाल्यानंतर करोना महामारीबाबत मोठय़ा प्रमाणात गाफीलपणा असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: मुखपट्टीचा वापर, करोना प्रतिबंधात्मक वर्तन यांबाबतचे गांभीर्य कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही संसर्ग झालेल्या ११९ रुग्णांमुळे प्रतिबंधात्मक वर्तनाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.  राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, राज्यात रविवापर्यंत १६७ रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यांपैकी बहुसंख्य रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांतून भारतात आले आहेत. या प्रवाशांच्या निकटवर्तीयांचाही ओमायक्रॉन रुग्णांमध्ये प्रामुख्याने समावेश आहे. १६७ रुग्णांपैकी ११९ रुग्णांचे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रुग्णांपैकी १८ वर्षांखालील लसीकरणास पात्र नसलेल्या लहान मुलांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही, मात्र करोना प्रतिबंधात्मक वर्तन कटाक्षाने करणे अत्यंत गरजेचे आहे.

करोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस घेणे अनिवार्य आहे, मात्र लस घेतल्यानंतर करोना प्रतिबंधक वर्तन विसरणे हे अक्षम्य आहे. प्रतिबंधात्मक लस ही आजाराची तीव्रता आणि त्यामुळे होणारा संभाव्य मृत्यू रोखण्यास मदत करते, मात्र लशीमुळे संसर्गच होत नाही, असे घडत नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मुखपट्टीचा वापर, हात धुणे, अंतर राखणे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, याची जाणीव सर्वानी ठेवणे आवश्यक आहे. 

डॉ. राजेश कार्यकर्ते, सूक्ष्मजीव शास्त्र विभाग प्रमुख, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय.