|| मुकुंद संगोराम

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाऊस पाडण्याचे काम सत्ताधारी पक्ष करतो, असा एक गाढव समज पुणेकरांनी करून घेतला आहे, असे खुद्द सत्ताधाऱ्यांनाच वाटते आहे. याहून भयावह काही असूच शकत नाही. याच सदरातून यापूर्वी, पाऊस कमी पडला असताना  शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय कारभाऱ्यांनी घ्यायला हवा, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु पाणी कमी दिले, तर आपल्याला मते मिळणार नाहीत, अशा बावळट समजात सत्ताधाऱ्यांनी आजअखेर नेहमीएवढेच पाणी देण्याचे धोरण सुरूच ठेवले. असे करताना आणखी एक बावळट समजूत अशी करून घेण्यात आली, की पाऊस वेळेवरच येणार आहे आणि तो पुरेसाही पडणार आहे. म्हणजे सात जूनला पाऊस पुण्यात येणार आणि आठ जूनला धरणसाठय़ांत भरपूर वाढ होईल. मग पुन्हा वर्षभर अंगठय़ाएवढी धार घरोघरी सुरू ठेवण्यात कसलीच अडचण नाही. कारण पुन्हा वर्षांअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होतातच आहेत.

भारतातला पाऊस बेभरवशी आहे, हे सत्य काही सत्ताधारी मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे पाणी जपून वापरा अशा घोषणा रस्तोरस्ती रंगवून प्रश्न सुटत नाही. दरमाणशी दर दिवशी धरणातून मिळणाऱ्या पाण्याचा अचूक हिशोब करून आवश्यक तेवढेच पाणी घेणे म्हणजे पाण्याचा जपून वापर करणे. पण हे पुणे महापालिकेच्या गावीच नाही. पुण्याच्या परिसरात असणाऱ्या चारही धरणसाखळीतील पाण्याचे आपणच मालक आहोत आणि आपण त्याचा वाट्टेल तसा वापर करू शकतो, अशी मग्रुरी पालिकेतील सगळे नगरसेवक सातत्याने दाखवत असतात. त्यामुळे पाण्याचा प्रचंड अपव्यय होत असूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्याची वृत्ती बळावते. पावसाळा संपता संपताच पुढील बारा महिन्याचे नियोजन करणे किती आवश्यक आहे, हे नगरसेवकांना वेगळे सांगण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना पुरेसे पाणी देणे ही पालिकेची जबाबदारी असली, तरीही ते पुरेसे किती हे ठरवणारी पालिका नसते.

गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपासूनच पुण्याच्या पाणीपुरवठय़ात एक तासाची कपात केली असती, तर आज धरणसाठय़ातील पाण्याची पातळी इतकी कमी झाली नसती. आजमितीस या धरणसाखळीत पंधरा जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे हे खरेच, पण त्याचे कारण या धरणांतून शेतीला जे पाणी द्यायचे असते, ते न दिल्याने हा साठा आहे. वास्तविक शेतीसाठी पाणी देणे हीही आवश्यकच, मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणीकपातीचा कटू निर्णय घेण्याचे कारभाऱ्यांनी टाळले. पाणीपुरवठय़ाचे नियोजन जगातील सगळ्या शहरांमध्ये पंधरा महिन्यांचे असते. अपवाद फक्त पुण्याचा. आपण आठ महिन्यांचाच हिशोब करून धरणातून पाणी पळवतो. भावनिक प्रश्न निर्माण करून पुणेकरांना वेठीला धरण्याचा हा उद्योग जलसंपदा खात्याने उघडकीस आणला, तेव्हाच हे सारे स्पष्ट झाले.

पुण्यात आजही दरडोई दर दिवशी मिळणारे पाणी गरजेपेक्षा कितीतरी अधिक आहे. म्हणजे तेवढे पाणी अरेरावी करून धरणातून घेतले जाते. प्रत्यक्षात शहराच्या प्रत्येक भागात टँकरच्या फेऱ्या कधीपासूनच सुरू झाल्या आहेत. दरडोई १३५ लीटर पाणी हे भारताचे धोरण आहे. पुणे मात्र त्याला संपूर्ण अपवाद. पुण्यात दररोज दरडोई तीनशेहून अधिक लीटर पाणी देता येईल, एवढे पाणी धरणातून घेतले जाते. ते नागरिकांच्या घरात मात्र पोहोचत नाही; म्हणजे पाणी कुठेतरी मुरते आहे. या मुरणाऱ्या पाण्याचा हिशोबच जलसंपदा खात्याने मागितला, तर कारभाऱ्यांनी केवढा गहजब केला. असल्या फडतूस नियोजनाने पुण्याचे तीनतेरा वाजले आहेत. राज्यातल्या अन्य शहरांमध्ये आठ ते पंधरा दिवसांनी एकदाच पाणी मिळते, हे नुसते ऐकूनही अंगावर काटा येणाऱ्या पुणेकरांना पाणीकपातीचा संदेश देण्यात महापालिका कमी पडली आहे, एवढे मात्र नक्की.

mukund.sangoram@expressindia.com