दोन वेळा हल्ला, शेकडो कोंबडय़ा मृत्युमुखी

पिंपरी : कुक्कुटपालन केंद्रामध्ये घुसून बिबटय़ाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दोन दिवसांच्या अंतरात बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात शेकडो कोंबडय़ा मृत्युमुखी पडल्या असून तितक्याच जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जुन्नरच्या आणे भागात ही घटना घडली.

जमादार यांच्या मालकीचे हे कुक्कुटपालन केंद्र आहे. तिथे एका बाजूला भिंत असून दोन बाजूने जाळी आहे. छताच्या बाजूला सिमेंटचे पत्रे आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर छताचा पत्रा उचकटून बिबटय़ा कुक्कुटपालन केंद्रात शिरला. त्यामुळे कोंबडय़ा भीतीने सैरभैर झाल्या. मोठय़ा प्रमाणात आवाज झाल्याने येथील कामगार धावून गेला. मात्र, बिबटय़ाला पाहून तोही घाबरला. बिबटय़ा एकामागोमाग एक याप्रमाणे कोंबडय़ा मारत होता. धाडस एकवटून कामगाराने बिबटय़ाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बिबटय़ा त्याच्या अंगावर धावून गेला. तो हल्ला कामगाराने चुकवला.

दोन दिवसांपूर्वीही बिबटय़ाने अशाच प्रकारे हल्ला केला होता. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.