आगामी ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन पंजाबमधील घुमान येथे घेण्याची धूर्त खेळी करीत या निर्णयावर महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपली मोहोर उमटवली आहे. त्यामुळेच उस्मानाबादचे ‘कवतिक’ बाजूला ठेवून मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना गुमानपणे हा निर्णय स्वीकारावा लागला आहे.
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई येथील मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषद आणि नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ या चार घटक संस्थांचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था दरवर्षीच्या साहित्यसंमेलन स्थळाची निवड करीत असते. या संस्थेच्या घटनेनुसार दर तीन वर्षांसाठी साहित्य महामंडळाचे कार्यालय एका घटक संस्थेकडे असते. सध्या हे कार्यालय पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. गेल्या वर्षी केवळ दोनच निमंत्रणे आल्यामुळे आचार्य अत्रे यांची जन्मभूमी असलेल्या सासवड येथे संमेलन घेण्याखेरीज पर्याय नव्हता.
‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ या न्यायाने साहित्य महामंडळाने दहा निमंत्रणांतून घुमान या स्थळाची निवड केली असली तरी त्यामागे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचाच वरचष्मा राहिला. महामंडळाला अधिकार असला तरी केवळ दोनच ठिकाणी स्थळ निवड समितीने दिलेली भेट ही वादाचा विषय ठरली. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर यंदाचे संमेलन बडोदा येथे भरविण्याची बडोदेकरांची तयारी होती, मात्र दोन वर्षांपूर्वी बडोदा या स्थळाला दिलेले संमेलन निधिसंकलनाअभावी नाकारण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर बडोदा या स्थळावर फुली मारण्यात आली. तर, मराठवाडय़ामध्ये झालेली गारपीट ही उस्मानाबाद स्थळाच्या निवडीमध्ये मारक ठरली.
दूरच्या अंतरावरचा प्रवास आणि संमेलन स्थळ लांब असले तरी निमंत्रक पुण्यातील कार्यकर्ते असल्याने घुमान हाच एकमेव पर्याय हाती उरला. मात्र, या निर्णयाला संत नामदेवांच्या कर्मभूमीचा संदर्भ असल्याने मराठवाडय़ातील पदाधिकाऱ्यांचाही नाईलाज झाला आणि घुमान या स्थळाचा गुमानपणे स्वीकार करण्याखेरीज त्यांच्या हाती काहीच उरले नाही. उस्मानाबाद येथील पदाधिकारी नाराज होणे स्वाभाविक आहे. पण, संत नामदेव हेदेखील मूळचे मराठवाडय़ातीलच आहेत, असे मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्वेसर्वा कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले. आमच्या ‘मसाप’ची संमेलने ही अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनापेक्षाही मोठी होतात. आम्ही हे संमेलन उस्मानाबाद येथे घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उस्मानाबाद असते तर…
अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनासाठी उस्मानाबाद या स्थळाची निवड झाली असती तर, मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रमुख या नात्याने संमेलनावर कौतिकराव ठाले-पाटील यांची छाप पडली असती. दुसरे म्हणजे प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांचे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी पुढे आले असते. या दोन्ही गोष्टींना फाटा देण्यासाठीच घुमान हा उपलब्ध स्थळांपैकी सर्वोत्तम पर्याय निवडण्यात आला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.