scorecardresearch

ऑनलाईन लेखकांना मिळणार ऑफलाईन व्यासपीठ; सोशल मीडियावर लिखाण करणाऱ्यांचं पुण्यात संमेलन

समाजमाध्यमांवरील संवादाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे ही संमेलनाची महत्त्वाची उद्दिष्टे असल्याचे मंगेश वाघ यांनी सांगितलं.

ऑनलाईन लेखकांना मिळणार ऑफलाईन व्यासपीठ; सोशल मीडियावर लिखाण करणाऱ्यांचं पुण्यात संमेलन
मराठी सोशल मीडिया संमेलन

समाजमाध्यमांवर मराठी भाषेतून अभिव्यक्ती करणाऱ्यांचे दुसरे संमेलन २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भरवण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि मगरपट्टा सिटी गृपचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे मंगळवारी अनावरण करण्यात आले.


मिरॅकल इव्हेंट्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महा आयटी, राज्य मराठी विकास संस्था यांचे संमेलनास सहकार्य लाभले आहे. संमेलनात प्रवेश विनामूल्य असेल. तसंच फेसबुक आणि युट्यूबवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष स्वरुपातील सहभागासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी करता येईल अशी माहिती संमेलनाचे आयोजक समीर आठल्ये यांनी दिली. मंगेश वाघ, प्रदीप लोखंडे, विनायक रासकर या आयोजकांसह प्लॅनेट मराठीच्या सह-उपाध्यक्षा जयंती वाघदरे यावेळी उपस्थित होत्या.


मराठीतून व्यक्त होणाऱ्या, वाचणाऱ्या आणि पाहणाऱ्या लोकांची संख्या वाढवणे, समाजमाध्यमांवरील चर्चांमधून तयार होणारा ताणतणाव प्रत्यक्ष भेटीतून कमी करण्याचा प्रयत्न करणे, नवनिर्मितीचा आनंद जास्तीत जास्त लोकांना मिळावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे समाजमाध्यमांवरील संवादाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे ही संमेलनाची महत्त्वाची उद्दिष्टे असल्याचे मंगेश वाघ यांनी सांगितलं.


याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले,”करोना काळात बऱ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत आणि अनेकजण समाजमाध्यमांवर व्यक्त होऊ लागले आहेत. विद्यापीठाप्रमाणे समाजमाध्यमेही शिक्षणाचे एक माध्यम आहे. याची व्याप्ती प्रचंड मोठी असून त्याचा उपयोग आपण केला पाहिजे.”

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-04-2022 at 18:45 IST

संबंधित बातम्या