आठवडी बाजार ही ग्रामीण भागाची ओळख आहे. आठवडी बाजाराची गंमत अनुभवायची तर शहरवासीयांनी कुठल्या तरी जवळच्या खेडय़ात जायला हवे. आठवडी बाजार असे स्वरूप नसले तरी पुण्यात दर आठवडय़ाने भरणारा एक बाजार मात्र आहे. ‘जुना बाजार’ या नावाने ओळखला जाणारा हा बाजार ही पुण्याची एक ओळख आहे. मंगळवार पेठेत हा बाजार भरतो. मुख्य बाजार रस्त्याच्या खाली आहे. रविवारी आणि बुधवारी मात्र विक्रेते वाढतात आणि त्यामुळे रस्त्यावरच हा बाजार भरतो. अर्थात तसे त्याचे स्वरूप आठवडी असेही नाही. कारण हा बाजार आठवडय़ात दोनदा भरतो. दर रविवारी आणि बुधवारी असे या बाजाराचे दोन ठरलेले दिवस. या बाजारात होणाऱ्या गर्दीचा विचार केला तर रविवारचा बाजार हा खरी गर्दी खेचणारा बाजार असतो. बाजारात त्या दिवशी सकाळपासून जी गर्दी सुरू होते ती सायंकाळी सातपर्यंत कायम असते. त्या तुलनेत बुधवारच्या बाजारात गर्दी कमी असते.

जुन्या बरोबरच नव्या-कोऱ्या वस्तू मिळणारा बाजार अशीही या बाजाराची ओळख आहे. दुकानांमध्ये जशा नामवंत कंपन्यांच्या वस्तू मिळतात तशाच वस्तू तशाच पँकिंगमध्ये या बाजारातही मिळतात. फरक फक्त दराचा असतो. जुन्या बाजारात हिंडता हिंडता अगदी रस्त्यावर खाली बसून वस्तू खरेदी करण्याची तुमची तयारी असेल, तर या बाजारात तुम्हाला खूप काही मिळेल.

Investment opportunities in FMCG
बदलत्या बाजाराचे लाभार्थी; ‘एफएमसीजी’मधील गुंतवणूक संधी
Commodity SEBI Developed Commodity Futures Market print eco news
क… कमॉडिटीचा : हवामान वायद्यासाठी ‘सेबी’ने तत्परता दाखवावी
Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी

या जुन्या बाजाराचेही काही भाग आहेत. म्हणजे कोणत्या वस्तू कोठे मिळणार हे इथे वर्षांनुवर्षे ठरलेले आहे. त्या वस्तूंची विक्री बाजाराच्या त्याच भागात होते. कोणताही विक्रेता आला आणि कोठेही बसला असा प्रकार इथे नाही. त्यामुळे इथे येणारी दर्दी मंडळी त्यांना हवी असलेली वस्तू घेण्यासाठी किंवा बघण्यासाठी कोठे जाणार हेही इथे ठरलेले असते. या बाजारात सहज फेरफटका मारला तरी त्याचे वेगळेपण लक्षात येते. याचे वेगळेपण म्हणजे इथे मिळणाऱ्या शेकडो प्रकारच्या वस्तू, उपकरणे, हत्यारे आणि खूप काही.

या बाजारात जुने कपडे मिळतात, तसे नवे कपडेही मिळतात. कपडे बाजाराचा एक विभागच येथे आहे. पादत्राणे म्हणजे चपला, बूट वगैरे सर्व प्रकार मिळतात. मुख्य म्हणजे बाजारात आलेली नवीन व्हरायटी येथे लगेचच आलेली असते. सैन्याच्या लिलावात वस्तू व अन्य गोष्टी खरेदी करून येथे त्या विक्रीसाठी ठेवणारी अनेक प्रसिद्ध दुकाने आहेत. त्यामुळे सैनिकांचे जुने कपडे, स्वेटर, रेनकोट, दणकट हॅवरसॅक, बूट, मोजे, हेल्मेट, तंबू, रजया अशा कित्येक गोष्टी येथे वर्षभर उपलब्ध असतात. त्या बरोबरच दुचाक्या आणि चार चाक्यांचे सुटे भाग, जुन्या गाडय़ांची इंजिने, त्यांची बोधचिन्हे यासह जे सुटे भाग आता नव्याने उपलब्ध नाहीत असे अनेक भाग या बाजारात हमखास मिळतात, असे सांगितले जाते. त्यामुळे या बाजारात कारागिरांची आणि तंत्रज्ञांची नेहमीच गर्दी असते. विविध उद्योगांना किंवा कारागिरांना जी लोखंडी वा धातूची हत्यारे लागतात ती देखील येथे उपलब्ध असतात. पूर्वी जुन्या नव्या कॅसेट येथे मोठय़ा प्रमाणात मिळायच्या. विद्युत विषयक सर्व उपकरणे म्हणजे इस्त्रीपासून ते संगणकापर्यंत आणि मिस्करपासून ते फ्रीजपर्यंत सर्व वस्तू या बाजारात उपलब्ध असतात. फक्त त्या त्या गोष्टीची किंवा वस्तूची खरेदी करताना तुम्हाला त्यातली किती माहिती आहे यावर ही खरेदी व वस्तूचा दर अवलंबून असतो. सायकली आणि सायकलींचे सर्व प्रकारचे सुटे भाग, प्रवासी बॅगा, रेनकोट, प्लास्टिकचे कागद, छत्र्या, पट्टे, गॉगल, चष्मे यांसह संसारोपयोगी बहुतेक सर्व वस्तूही येथे मिळतात.

घरगुती तसेच कार्यालयांमध्ये लागणारे फर्निचर या बाजारात सदैव उपलब्ध असते. विशेषत: लाकडी आणि गोदरेजची कपाटे, खुच्र्या यासह इतर सर्व प्रकारचे फर्निचर येथे मांडलेले असते. धातूच्या शेकडो वस्तू, तसेच ज्या वस्तूंना ऐतिहासिक महत्त्व आहे अशा वस्तू या बाजारात नेहमीच लक्ष वेधून घेत असतात. एकुणातच या बाजाराचा फेरफटका हा आपल्याला एका नव्याच गोष्टीची ओळख करून देतो. या बाजाराच्या आणखी काही वैशिष्टय़ांबद्दल पुढच्या भागात..