पुणे : विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये हवेतील आर्द्रता वाढून उकाडा वाढणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणाच्या खालच्या स्तरात हवेची एक द्रोणीय रेषा दक्षिण तमिळनाडू ते आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत तयार झाली आहे. ही द्रोणीय रेषा विदर्भावरून जाते. तसेच अरबी समुद्रावर एक प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. या वातावरणाच्या स्थितीमुळे पुढील तीन दिवस विदर्भात तापमानात वाढ होणार आहे. प्रामुख्याने यवतमाळ, अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात कमाल-किमान तापमान वाढीसह रात्री उकाडा वाढण्याचाही अंदाज आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>इंदापूरमधील नाराजीवर मनोमीलन सभेचा उतारा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मेळावा

अरबी समुद्रावर तयार झालेल्या प्रती चक्रवाताच्या स्थितीमुळे अरबी समुद्रावरून गुजरातकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहत आहे. हे वारे गुजरातवरून महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे येत आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडच्या किनारपट्टीवर तापमानात वाढ होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ, अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

असा आहे पावसाचा अंदाज

शनिवार – अमरावती, वाशिम, यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता.

धुळे, नंदूरबार, नाशिक, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद येथे मेघर्गजना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज.

रविवार – नगर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज.

सोमवार – नगर, सोलापूरसह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात मेघर्गजना, विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज.