चिन्मय पाटणकर

राज्यात लोकप्रिय असलेल्या चार वर्षे मुदतीच्या कृषी पदवी अभ्यासक्रमांमध्ये कृषी  (बीएस्सी अ‍ॅग्री), बी.टेक अन्न तंत्रज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल आहे. गेली काही वर्षे झालेल्या प्रवेशांतून हे चित्र स्पष्ट झाले आहे.

राज्यातील कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असल्याने या अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहात नाहीत. त्याशिवाय कृषी अभ्यासक्रमांतील काही अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद आहे. त्यात सर्वात जास्त बीएस्सी कृषी, अन्न तंत्रज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी हे अभ्यासक्रम आघाडीवर आहेत. तर त्यानंतर जैवतंत्रज्ञान, उद्यनविद्या, वनविद्या, सामुदायिक विज्ञान आणि मत्स्यविज्ञान या अभ्यासक्रमांचा क्रमांक लागतो, अशी माहिती कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

‘बीएस्सी कृषी, अन्न तंत्रज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी हे तीन अभ्यासक्रम व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता आपल्याकडे अन्न तंत्रज्ञानाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे. अन्न सुरक्षा कायद्यामुळे बऱ्याच संधी निर्माण झाल्या आहेत. स्टार्टअपमध्ये अशा व्यवसायांना कर्ज मिळते. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाकडे कल वाढला असल्याने छोटी उपकरणे किंवा यांत्रिक गरजा पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान महत्त्वाचे ठरते. त्यामुळे कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे महत्त्व आहे.

या तीन अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे. भविष्यातील गरज ओळखून या तीन अभ्यासक्रमांतून जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ करणे आवश्यक आहे,’ असेही डॉ. कौसडीकर यांनी सांगितले.

कृषी पदविकांना प्रतिसाद नाही

एकीकडे चार वर्षे मुदतीच्या कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहात नसताना दहावीनंतरच्या कृषी पदविका अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. राज्यातील कृषी तंत्र विद्यालये आणि कृषी तंत्रनिकेतनांमध्ये मिळून कृषी पदविकांच्या जवळपास ७६०० जागा उपलब्ध आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसल्याने त्यातील जवळपास निम्म्या जाग्या रिक्त राहात असल्याची माहिती डॉ. कौसडीकर यांनी दिली.