कोंढवा भागातील घटना; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कचराकुंडी भरलेली असताना रस्त्यावर कचरा टाकल्याने झालेल्या वादातून एकावर तलवारीने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात मंगळवारी सकाळी घडली.

गुड्डु महंमद कुरेशी (वय ४५, रा. राम मंदिरानजीक, कोंढवा खुर्द) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी स्वप्नील बाळासाहेब कामटे आणि कल्पेश बाबर (दोघे रा. राम मंदिरानजीक, कोंढवा खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुमताज कुरेशी (वय ३८) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक परवेझ शिकलगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी यांचा कपडेविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. कुरेशी यांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या कचराकुंडीत मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास कचरा टाकला. कचरा कुंडी भरली असल्याने कचरा रस्त्यावर आला होता. आरोपी कामटे आणि बाबर तेथेच राहायला आहेत. आरोपींनी कुरेशी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांना काठीने मारहाण करून त्यांच्यावर तलवारीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या कुरेशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच ते मरण पावले होते. सहायक निरीक्षक शिकलगार तपास करत आहेत.