अन्न सुरक्षा कायदा आणल्याचा कागद गरिबांच्या ताटात ठेऊन त्यांची भूक भागणार नाही. देशात कायदे खूप झाले, आता अॅक्शनची वेळी आली असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाच्या प्रचार समितीचे प्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुण्यात झालेल्या निर्धार सभेत कॉंग्रेस पक्षावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.
पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सभेमध्ये मोदी यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारच्या गेल्या नऊ वर्षातील भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. सभेला सुमारे २० हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.
मोदी म्हणाले, यूपीए सरकारने अन्न सुरक्षा विधेयकाचे श्रेय घटक पक्षांना मिळू नये, यासाठीच हे विधेयक पहिल्यांदा संसदेत न मांडता त्यावर अध्यादेश काढण्याची घाई केली. या विधेयकावर संसदेत साधक बाधक चर्चा होऊन त्यातील त्रुटी दूर करता आल्या असत्या. मात्र, त्याचे श्रेय इतरांना मिळू नये,यासाठीच हे विधेयक अगोदर संसदेत मांडण्यात आले नाही.
पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी घोषणा दिली होती. त्याच पुण्यामध्ये आता सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे मोदी यांनी सांगितले.
कॉंग्रेेसने लोकांना कायम गृहीत धरले आहे, असे सांगत मोदी म्हणाले, देश स्वतंत्र झाला, त्यावेळी रुपया आणि डॉलरची किंमत समसमान आहे. मात्र, आता परिस्थिती अशी झाली आहे की डॉलरची किंमत अर्थमंत्र्यांच्या वयापर्यंत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हे अर्थमंत्री नसून, अनर्थमंत्री आहेत. कॉंग्रेसमुळेच चांगला अर्थशास्त्रीदेखील अनर्थशास्त्री बनतो. कॉंग्रेसमुक्तीशिवाय देशामध्ये समस्यामुक्ती शक्य नाही.
सीमेवर दोन जवानांचे शिर कापून नेल्यानंतर आठवडाभरात पाकिस्तानच्या मंत्र्यांसोबत आपले परराष्ट्रमंत्री चिकन बिर्याणी खात बसतात, यावर प्रहार करीत मोदी यांनी कॉंग्रेस पक्षाने गेल्या ६० वर्षांमध्ये केलेल्या विविध घोषणांचे आता काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. गरिबी हटाओ, १०० दिवसांत महागाई हटविणार या घोषणांचे काय झाले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
कॉंग्रेसने देशातील घटनात्मक संस्थांचा आणि पदांचा राजकारणासाठी वापर केला, असा आरोप करून जुन्या पिढीने तुम्हाला माफ केले, नवीन पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे मोदी म्हणाले.
सभेला खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, पक्षप्रवक्ते प्रकाश जावडेकर यांच्यासह पुण्यातील पक्षाचे आमदार आणि नेते उपस्थित होते.